खेळताना पिशवी डोक्यात अडकून गतिमंद मुलाचा मृत्यू

घरात खेळत असताना  डोक्यात पिशवी अडकून श्वास कोंडल्याने एका गतिमंद मुलाचा मृत्यू झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. ही दुर्दैवी घटना कोपरीत घडली. अभिजित नाईक असे मृत मुलाचे नाव आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. याप्रकरणी कोपरी पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

आनंदनगर येथील कामगार केंद्राजवळ नाईक कुटुंबीय राहतात. अभिजित हा घरातील पोटमाळ्यावर एकटाच खेळत होता. त्याची आई कामावरून घरी आल्यावर त्यांनी अभिजितला शोधण्याचा प्रयत्न केला. त्या पोटमाळ्यावर गेल्या असता अभिजित प्लॅस्टिकची पिशवी डोक्यात घातलेल्या अवस्थेत बेडवर निपचित पडलेला आढळला. आई आणि मावशीने डोक्यातली पिशवी काढून त्याला तातडीने एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. अभिजितने प्लॅस्टिकची पिशवी डोक्यात घातल्याने त्याचा श्वास कोंडल्यामुळे त्याचा मृत्यू झाल्याची शक्यता डॉक्टरांनी व्यक्त केली.