रविवारी लागणार एक तासाचं ‘ग्रहण’

68

सामना ऑनलाईन । मुंबई

सध्या झी मराठीवरच्या ग्रहण या नवीन रहस्यमय मालिकेने प्रेक्षकांना त्याच्या टीव्ही स्क्रीनला खिळवून ठेवलेआहे. बऱ्याच काळानंतर पल्लवी जोशीचे छोट्या पडद्यावर झालेलं पुनरागमन आणि गूढ मालिकेतील तिचा कमालीचा अभिनय प्रेक्षकांचा पसंतीस पडत आहे. निरंजन, मोनू आणि लक्ष्मी यांच्यात रमा तिचे हरवलेले कुटुंबीय शोधतेय आणि त्यांना आपल्या जवळ कसं करता येईल यासाठी ती धडपड करताना दिसते. येत्या रविवारी १५ एप्रिल रोजी ग्रहण मालिकेच्या १ तासाच्या विशेष भागात रमा तिचं हरवलेलं कुटुंब पूर्ण करण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करणार आहे आणि याच्यामध्ये ज्यांनी येणाच्या प्रयत्न केला त्यांचा रमाने काटा काढण्याचे ठरवले आहे.

मालिकेविषयी बोलताना रमा म्हणजेच अभिनेत्री पल्लवी जोशी म्हणाल्या, “गूढ कथांचे आकर्षण मला पहिल्यापासूनच आहे सुरुवातीला जेव्हा मला मालिकेबाबत विचारण्यात आले तेव्हा मी नाही म्हणण्याच्या बेतात होते, पण जेव्हा पटकथा वाचली मला ती प्रचंड आवडली आणि ही कथा प्रेक्षकांना खिळवून ठेवणारी आहे. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे ही संपूर्ण मालिका फक्त १०० भागांचीच आहे. त्यामुळे सर्वसाधारण मालिकांमध्ये येणारा फापटपसारा येथे येण्याची शक्यता खूप कमी आहे. जेव्हा मी ही मालिका करण्याचे ठरवले तेव्हा सर्वप्रथम धारपांची ‘ग्रहण’ ही कादंबरी संपूर्ण वाचून काढली. आम्ही मालिकेचा गाभा ही कादंबरीच ठेवली असली तरी कथानकात बरेच बदल केलेआहेत. व्यक्तिरेखांची नावे देखील बदलली आहेत. मला खात्री आहे एका नंतर एक येणाऱ्या भागातून उलगडणारी ही कथा प्रेक्षकांना नक्कीच खिळवून ठेवेल आणि त्यासाठी हा एक तासाचा विशेष भाग पाहायला विसरू नका” असं पल्लवी जोशी यांचं म्हणणं आहे.

आपली प्रतिक्रिया द्या