हिंदुस्थानी नेत्यांसाठी आता फेसबुकची हॉटलाइन सर्व्हिस

<< स्पायडरमॅन>>

केंब्रिज एनालिटीकाच्या धक्क्याने खडबडून जागे झालेल्या फेसबुकने आता आपली सुरक्षा चांगलीच कडक करण्याचे धोरण अवलंबिले दिसते आहे. फेसबुकने नुकतीच हिंदुस्थानच्या राजकीय नेत्यांसाठी आणि राजकीय पक्षांच्या डाटा सुरक्षेसाठी खास हॉटलाइन सर्व्हिस सुरू करण्याची घोषणा केली आहे. त्याचबरोबर देशातील निवडणुकांना डोळ्यांसमोर ठेवून फेसबुक लवकरच एक इलेक्शन इंटिग्रिटी माइक्रोसाइटदेखील सुरू करणार आहे.

या हॉटलाइन सर्व्हिसच्या अंतर्गत डाटाच्या सुरक्षेला कोणत्याही प्रकारचा धोका निर्माण झाल्यास अथवा तशी शंका आल्यास सरकारच्या इलेक्ट्रॉनिक आणि आयटी मंत्रालयाच्या अंतर्गत काम करणारी कॉम्प्युटर इमर्जन्सी रिस्पॉन्स टीम indiacyberthreats@fb.com वर तातडीने तक्रार करू शकणार आहे. निवडणुकीच्या काळात राजकीय नेते किंवा पक्षाच्या फेसबुक खात्यांना हॅकरकडून लक्ष्य केले जाण्याची भीती यामागे असल्याचे बोलले जात आहे.