उपवासाची ‘स्पेशल इडली’

सामना ऑनलाईन । मुंबई

नवरात्रीचे नऊ दिवस हे देवीच्या भक्तांसाठी विशेष महत्त्वाचे असतात. हे नऊही दिवस उपवास करुन भक्त देवीची आराधना करतात. यामुळे नऊ दिवस चालणाऱ्या या उपवासात नेमके काय खावे असा प्रश्न महिलांना सतावत असतो. उपवासासाठी काही ठराविकच पदार्थ खावे लागत असल्याने उपवासाच्या एक-दोन दिवसातच तेच तेच पदार्थ खाऊन कंटाळा येतो. यासाठीच सामना ऑनलाईन टीम नऊ दिवसांसाठी नवरात्रीच्या स्पेशल रेसिपी देत आहे. अशीच एक रेसिपी आहे… उपवासाची ‘स्पेशल इडली’

साहित्य –

१) पाव किलो वरईचे (वरी) तांदूळ (भगर)
२) दोनशे ग्रॅम कच्चा साबुदाणा
३) २०० ग्रॅम दही
४) चवीपुरते मीठ
५) चिमूटभर बेकिंग सोडा
६) अर्धा चमचा जिरे

कृती – सर्वप्रथम वरईचे तांदूळ आणि साबुदाणा वेगवेगळा मिक्सरमध्ये वाटून घ्यावा. त्यानंतर एका पातेल्यात हे मिश्रण एकत्र करावे. त्यात दही, मीठ, जिरे आणि बेकींग सोडा व गरज वाटल्यास अर्धा कप पाणी टाकून एकजीव करावे. २० मिनिटे हे मिश्रण झाकून ठेवावे. त्यानंतर इडलीपात्रात नेहमीप्रमाणेच या मिश्रणाची इडली बनवावी. बनवायला सोपी आणि खायला मस्त अशी ही इडली नारळाच्या चटणीबरोबर अप्रतिम लागते.

आपली प्रतिक्रिया द्या