मायबोलीचे नवे रुपडे!

397
  • ज्योत्स्ना गाडगीळ

`सुंदर हस्ताक्षर हे आपल्या सुंदर मनाचे प्रतिबिंब असतं म्हणे! बालपणी कित्येकदा अक्षरपाट्या गिरवल्या, पण काही केल्या अक्षराला वळण लागले नाही! अक्षर सुलेखन (कॅलिग्राफी) प्रकार तर कोसो दूर राहिला! मात्र कोणाचे सुंदर, सुवाच्च अक्षर पाहिले की आजही जीव जळतो, आपल्याला कधीच असे वळणदार अक्षर काढता येणार नाही का?’, असा नकारात्मक विचार तुम्ही करत असाल, तर जरा थांबा! तसाही सध्या आपला संपर्क वही-पेनाशी नाही, तर कॉम्प्युटर, लॅपटॉप, मोबाईलशी येतो. तिथे वळणदार अक्षर काढता यावे, ह्यासाठी ग्राफिक डिझायनर मनोज जायस्वाल घेऊन आला आहे, मराठी कॅलिग्राफी फॉन्ट्स’! शेवटी हा `इन्स्टंट फूड’ चा जमाना आहे बॉस!

manoj-jaiswal

आकृती’, ‘एपीएस’, ‘श्रीलिपी’ अशा मराठी सॉफ्टवेअरचे फॉन्ट गेली दोनेक दशके आपण वापरत आलो आहोत. सरधोपट मायना वगळता शीर्षक, सारांश ह्या बाबी अधोरेखित करण्यासाठी गरज लागते, ती वळणदार अक्षराची. अशा वेळी एक तर अक्षर सुलेखन करणाऱ्या कलाकाराकडून शीर्षक लिहून, स्कॅन करून, एडिट केले जाते, नाहीतर ‘कोरल ड्रॉ’ , ‘फोटो शॉप’, ‘इनडिझाईन’, ‘इलस्ट्रेटर’, ‘पेजमेकर’ इ. सॉफ्टवेअरचा वापर करून आर्टिस्टना वेगवेगळी कलाकुसर करावी लागते. पण त्यासाठी खूप वेळ लागतो. त्यात कॉम्प्युटरने हँग न होता साथ दिली तर ठीक, नाहीतर कामाचा व्याप पाहून आपल्यावर हँग होण्याची वेळ येते. प्रसार माध्यमाशी संलग्न असलेल्या प्रत्येकाला ह्या समस्येला सामोरे जावेच लागते. ह्या पाश्र्वभूमीवर मनोजने तयार केलेला ‘मराठी कॅलिग्राफी फॉन्ट्स’ हा त्यासाठी चांगला पर्याय ठरू शकतो.

२६ वर्षांचा मनोज, अपघातानेच संगणक क्षेत्रात आला. उच्चशिक्षण घेण्याचा त्याचा मानस होता, परंतु घरची आर्थिक स्थिती पाहता, त्याला आपल्या स्वप्नांना मुरड घालावी लागली. तो मूळचा धुळ्याचा. `आर्वाr’ ह्या गावात त्याचे बालपण गेले. प्राथमिक शिक्षणही तिथेच झाले. धुळ्यातील महाविद्यालयातून तो कलाशाखेत पदवीधर झाला. बारावीनंतर त्याने गावात नुकत्याच सुरू झालेल्या कॉम्प्युटर क्लासमध्ये संगणकाचे प्राथमिक प्रशिक्षण घेण्यासाठी प्रवेश घेतला. कोर्सचा एक महिन्याचा कालावधी पूर्ण होण्याच्या आतच तो तिथे शिकता शिकता प्रशिक्षक म्हणून रुजू झाला. संगणक शिक्षणात अधिक माहिती मिळावी म्हणून पदवीचे शिक्षण घेत असतानाच त्याने धुळ्यातील ‘बॉस्टन इन्स्टिट्यूट’मधून ग्राफिक डिझाईनिंगचा १४ महिन्यांचा कोर्स केला. एव्हाना संगणकाशी त्याची चांगली मैत्री झाली होती. पैशांचा जुगाड करून त्याने घरीच एक संगणक विकत घेतला. अभ्यास सांभाळून गावातली जाहिरातींची कामे घेतली. त्यातून थोडीफार मिळकत होत होती. ग्राफिक डिझाईनचे प्रशिक्षण पूर्ण होण्याच्या आतच, त्याला बडोद्यातील एका एमएनसी कंपनीत नोकरी मिळाली. तिथे वर्षभर नोकरी केल्यानंतर त्याने थेट मुंबई गाठली आणि अंधेरीच्या एका आंतरराष्ट्रीय जाहिरात कंपनीत तो नोकरीला लागला. आंतरराष्ट्रीय कंपनी म्हटल्यावर तिथल्या ग्राहकांच्या मागणीनुसार दिलेल्या वेळेत उत्तम दर्जाचे सेवा देणे ओघाने आलेच. कामाचा ताण असला, तरी त्या तीन वर्षांत मनोजची चांगलीच ‘हातसफाई’ झाली. ग्राफिक डिझाईनचे बारकावे कळले. अनुभवाची शिदोरी घेऊन त्याने पुणे गाठले आणि तिथेच आपले बस्तान मांडायचे ठरवले.

पुण्यात ‘अॅफिनिटी एक्सप्रेस’ कंपनीत रुजू झाल्यावर मनोजला ग्राफिक डिझाईनबरोबरच ग्राफिक्सचे, व्यवसाय व्यवस्थापनाचे प्रशिक्षण मिळाले. तिथे संपूर्ण काम इंग्रजीत चालत असे. कारण, तीदेखील आंतरराष्ट्रीय जाहिरात कंपनी होती. विविध प्रकारच्या इंग्रजी फॉन्टचे काम करत असताना मनोजच्या लक्षात आले, की जेवढे पर्याय इंग्रजी फॉन्टमध्ये उपलब्ध आहेत, त्याच्या चतुर्थांश फॉन्ट प्रादेशिक भाषांमध्ये आहेत. ‘युनिकोड’ च्या माध्यमातून प्रादेशिक भाषा जगभरापर्यंत पोहोचवली गेली. पण कलात्मकतेच्या दृष्टीने फॉन्ट सजवायचे, तर आजही लोकांना सुलेखन कलाकारांवर, चांगल्या ग्राफिक डिझाईनरवर, महागड्या सॉफ्टवेअरवर विसंबून राहावे लागत आहे. त्यात बराच वेळ खर्च होत आहे. पैशांचा अपव्यय होत आहे, शिवाय नाविन्यपूर्ण कलाकृती जन्म घेत नाहीये. ह्या सर्व बाबी लक्षात घेता, मनोजने सर्वप्रथम मराठी भाषेचे रुपडे पालटायचे ठरवले. ह्या कामाला पुरेसा वेळ देता यावा, यासाठी त्याने नोकरी सोडली आणि स्वत:च्या नव्या व्यवसायात पैसे गुंतवून कामाला सुरुवात केली आणि `ऑर्टामेनिआ’ स्टुडिओची स्थापना केली.

‘फॉन्टमेकिंग’चे प्रोजेक्ट मराठी भाषेपुरते मर्यादित न ठेवता देशातील अन्य प्रादेशिक भाषांमध्येही विकसित करता यावे, यासाठी मनोजने व्यापक दृष्टीकोन ठेवून त्याचे नामकरण ‘इंडियाफॉन्ट.कॉम’ असे केले. त्याच्याकडे फॉन्ट तयार करण्याचा पूर्वानुभव नव्हता, त्यामुळे इंटरनेटवर माहिती घेऊन त्याने प्रत्यक्ष कामाला सुरुवात केली. फॉन्ट डिझाईन, कन्सेप्ट, गाईडलाईन, निर्मिती, लॉजिक, प्रेझेंटेशन असा सगळा प्रवास त्याने एकहाती केला. एKTण ९९ कॅलिग्राफी फॉन्ट्स बनवण्यासाठी त्याला दोन वर्षे लागली. अलिकडेच त्यात आणखी तीन फॉन्ट्सची भर त्याने घातली आह़े

या अनुभवाबद्दल विचारले असता मनोज सांगतो, `आपण एखादे अक्षर कीबोर्डवर टाईप करतो आणि ते स्क्रीनवर उमटते, ह्याचा अर्थ कॉम्प्युटरला आपली भाषा कळत असते, असे नाही. त्यासाठी `युनिकोड’ ही संगणक भाषाच त्याला कळते. त्याचा तपशील इंटरनेटवर आपण वाचू शकतो. पण त्यात आव्हानात्मक होते, ते मराठी भाषेतील जोडाक्षरे तयार करणे. त्या शब्दांना साज देणे आणि ते करत असताना अक्षर तुटू नये ह्याकरिता प्रत्येक अक्षरामागे असलेली संगणकीय भाषा प्रस्थापित करणे यासाठी मला खूप वेळ लागला. अथक परिश्रम घ्यावे लागले. फॉन्टचे कोड सेट केल्यावर त्यांना डिझाईन करणेही तेवढेच आव्हानात्मक होते. हे फॉन्ट विविध ठिकाणी वापरले जातात. वैद्यकीय, मनोरंजन, माहिती, प्रबोधन अशा सर्व ठिकाणी फॉन्टचे महत्त्व असते. संबंधित विषयांतील मायना फॉन्टबदल करून आणखी आकर्षित करता यावा यासाठी जवळपास सर्व क्षेत्रे नजरेसमोर ठेवून मी फॉन्ट डिझाईन तयार केले. यासाठी प्रत्येक फॉन्टमधील प्रत्येक अक्षराचे ग्राफिक्स तयार केले. हे फॉन्ट साधेसुधे नाहीत, तर कॅलिग्राफी फॉन्ट्स आहेत, त्यासाठी मनोजने वेगवेगळे पॅटर्न तयार केले. बरीच मेहनत झाल्यावर सरतेशेवटी विविध फॉन्टचे नामकरण केले. ज्यात रेषांचा वापर केला त्याला `एएमएस रेषा’, ज्या अक्षरांना गोलाई आहे, त्याला `एएमएस वंâगना’, ज्यात अक्षरांना पानाचा आकार दिला आहे, त्याला ‘एएमएस लीफ’, ज्यात हिऱ्याचे पैलू दाखवलेत, त्याला ‘एएमएस डायमंड’ अशी विविध नावे ठेवली.  नावाप्रमाणेच हे फॉन्ट पाहताक्षणीच आपले लक्ष वेधून घेतात.’

‘माझ्याआधी अनेकांनी ह्यादृष्टीने प्रयत्न केले असतीलही, परंतु बाजारात ते बघायला मिळत नाहीत. म्हणून संगणक वापरकत्र्यांना जुन्या पद्धतीनेच काम करावे लागत आहे. मात्र, मी केलेले फॉन्ट नेटवरून डाऊनलोड करून आर्टिस्टलाच नव्हे तर कोणत्याही संगणकचालकाला ते सहजपणे वापरता येणार आहेत. माझे श्रम, आर्थिक गुंतवणूक आणि कल्पकता ह्यांचा वापर केल्यामुळे ते मोफत न ठेवता त्यासाठी मी नाममात्र विंâमत आकारलेली आहे. परदेशात अशा कामासाठी ग्राहक पाण्यासारखे पैसे खर्च करण्यास तयार असतात. मलाही तो मार्ग निवडून पैसा कमवता आला असता, परंतु मला आपल्या भाषेसाठी काम करायचे होते, तिच्यात परिवर्तन घडवायचे होते, म्हणून मी हा मार्ग स्वीकारला आहे. भविष्यात मला इंग्रजी अक्षरांच्या जागी मराठी अक्षरे छापलेला कीबोर्ड तयार करायचा आहे, जो कोणीही सहज वापरू शकेल. तसेच ह्या क्षेत्रातले ज्ञान प्रत्येक गरजवंताला मिळावे म्हणून सोप्या भाषेत माहिती देणारे सीडी, ऑडिओ, व्हीडिओ आणि पुस्तक बाजारात उपलब्ध करून द्यायचे आहे. तसेच गल्ली ते दिल्ली असलेल्या प्रत्येक ग्राफिक आर्टिस्टला घरबसल्या रोजगार कमवता यावा, यादृष्टीने इंटरनेटच्या मदतीने संपर्काचे मोठे जाळे विणायचे आहे.’

लहान वयात एवढी मोठी स्वप्ने बघणारा मनोज अनुभवाने मोठ्या व्यावसायिकासारखा धीरगंभीरपणे आपले मुद्दे मांडतो. संगणकीय भाषा सर्वसामान्यांना कळणे अवघड असले, तरी ती समजावण्याचा प्रयत्न करतो. या त्याच्या मेहनतीचे फलित म्हणजेच `इंडियाफॉन्ट’ला मिळालेले यश. ह्या वर्षाच्या सुरुवातीला मकरसंक्रांतीच्या मुहूर्तावर त्याने आपले प्रॉडक्ट बाजारात आणले. गेल्या चार महिन्यांत सोशल मिडियावर टइंडियाफॉन्ट’चे १३,०००हून अधिक चाहते झाले. टमराठी कॅलिग्राफी फॉन्ट्स’ असा गुगलवर सर्च घेतला, तर ‘इंडियाफॉन्ट.कॉम’ चे संकेतस्थळ अव्वलस्थानी दिसते. यावरून त्या फॉन्टची लोकप्रियता आपल्याला लक्षात येऊ शकते. मात्र, एवढ्या यशावर मनोजला थांबायचे नाही. त्याला भारतातल्या प्रादेशिक भाषांमध्येही फॉन्ट तयार करायचे आहे. यासाठी एक छोटीशी टीम हाताशी घेऊन येत्या दोन वर्षांत ५०-६०,००० फॉन्ट्स बनवण्याचे ध्येय त्याने आखले आहे. त्याची घोडदौड पाहता, तो आपले ध्येय निश्चितच गाठू शकेल, असे वाटते. मनोजमुळे आपल्या मायबोलीला एक नवा साज चढत आहे, भविष्यात तिचा जास्तीत जास्त वापर केला जाणार आहे आणि तिचे हे पालटलेले रुपडे जगभरात झळकणार आहे, ह्याचा विशेष आनंद आहे!

आपली प्रतिक्रिया द्या