दंगलीच्या चौकशीसाठी ‘एसआयटी’, २५ अधिकारी व कर्मचाऱ्यांचा समावेश

31

सामना प्रतिनिधी । संभाजीनगर

बेकायदा नळ जोडणी तोडल्याचे कारण पुढे करून भडकावण्यात आलेल्या शहरातील दंगलीच्या सखोल चौकशीसाठी एसआयटी नेमण्यात आली आहे. प्रभारी पोलीस आयुक्तांनी आज ही घोषणा केली. दोन उपायुक्तांसह २५ अधिकारी व कर्मचारी असलेले हे पथक तपास अधिकाऱ्यांना मदत करणार आहे. ‘एसआयटी’ने दंगलग्रस्त भागातील सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले असून, त्याआधारे दंगेखोरांची धरपकड करण्यात येणार आहे. दंगलीत एकूण दीडशे ते पावणेदोनशे वाहने व दुकाने जळून खाक झाली असून, यात सुमारे १० कोटींचे नुकसान झाले आहे.

बेकायदा नळ कनेक्शन कट केल्याच्या कारणाकरून शहरात शुक्रवारी रात्री दंगल उसळली होती. यात जगनलाल बन्सिले यांना घर पेटवून देऊन जिवंत जाळण्यात आले होते, तर अब्दुल हरीश अब्दुल हारुण कादरी या तरुणाचा पोलीस गोळीबारात मृत्यू झाला होता. तसेच सहायक पोलीस आयुक्त गोवर्धन कोळेकर, बेगमपुरा पोलीस ठाण्याच्या निरीक्षक राजश्री आडे, सिटी चौक पोलीस ठाण्याच्या निरीक्षक हेमंत कदम, क्रांती चौक पोलीस ठाण्याचे निरीक्षक श्रीपाद परोपकारी हे गंभीर जखमी झाले आहेत. दंगेखोरांनी १५० हून अधिक दुचाकी व चारचाकी वाहने फोडून ती पेटवून दिली. यात जवळपास ५० हून अधिक दुकाने जाळून खाक झाली, तर ७० च्यावर दुकाने व घरे फोडून लुटमार करण्यात आली. यात एकूण दहा कोटींचे नुकसान झाले. या पार्श्वभूमीवर दंगलीची निष्पक्ष चौकशी करण्याचे आदेश गृह विभागाने पोलीस आयुक्तांना दिले आहेत.

महसूलची चार पथके, पाच दिवसांत पंचनामे
दंगलीची चौकशी करण्यासाठी विशेष तपास पथक (एसआयटी) स्थापन करण्याचे निर्देश देण्यात आले होते. त्यानंतर ‘एसआयटी’ची स्थापना होताच पथकाकडून दंगलग्रस्त भागाची पाहणी केली जाणार आहे. सगळ्या बाजूंनी हे पथक घटनेची चौकशी करणार आहे. या एसआयटीसोबतच महसूल विभागाची चार पथकेही तैनात करण्यात आली आहेत. या पथकांनी नुकसानीचे पंचनामे करण्यास सुरुवात केली आहे. पाच दिवसात पंचनामे तयार करून त्याचा अहवाल शासनाला सादर केला जाईल.

हे पहा गुलेल…
शहर भडकावण्यासाठी दंगलखोरांनी कश्मीर मोडय़ूलचा वापर केला. नवाबपुऱ्यातील बहुमजली इमारतींवर काही दिवसांपासून दगडगोटे नेऊन ठेवण्यात येत होते. खालच्या एका खांबाला रातोरात दहा फुटांचे गलोल बांधण्यात आले. त्याला पोतडय़ाची झोळी करण्यात आली. अपार्टमेंटच्या टेरेसवर असलेल्या शिडीला सायकलचे टय़ूब फाडून त्याचा गलोल करण्यात आला. या गलोलात एकाच वेळी अनेक दगड टाकून तो राजाबाजारवर नेम धरून भिरकावण्यात आला. गलोलीत आलेल्या दगडानेच सहायक पोलीस आयुक्त गोवर्धन कोळेकर हे गंभीर जखमी झाले तर हेमंत कदम व श्रीकांत परोपकारी हे पोलीस अधिकारी जायबंदी झाले.

आपली प्रतिक्रिया द्या