गणपती विसर्जनासाठी पश्चिम रेल्वे सोडणार विशेष लोकल

शेवटची विशेष डाऊन (चर्चगेट-विरार) ट्रेन पहाटे 3.20 मिनिटांनी सुटणार; शेवटची विशेष अप (विरार-चर्चगेट) ट्रेन पहाटे 3.00 मिनिटांनी सुटणार

अनंत चतुर्दशी 9 सप्टेंबर रोजी असून या दिवशी विसर्जनासाठी मोठी गर्दी होत असते. गिरगाव चौपाटीवर विसर्जनासाठी येणारे गणपती पाहण्यासाठी तसेच विसर्जनासाठी मुंबईच्या विविध भागातून नागरीक मुंबईत येत असतात. या नागरिकांना दक्षिण मुंबईत येण्यासाठी आणि दक्षिण मुंबईतून आपल्या घरी जाण्यासाठी कोणतीही अडचण होऊ नये यासाठी पश्चिम रेल्वे दरवर्षी विशेष लोकल गाड्या सोडत असते.

या वर्षीही पश्चिम रेल्वेने काही विशेष गाड्या सोडायचं ठरवलं असून त्याचं वेळापत्रक प्रसिद्ध करण्यात आलं आहे. ‘कू’ या स्वदेशी सोशल मीडिया अॅपवर पश्चिम रेल्वेने हे वेळापत्रक प्रसिद्ध केलं आहे. या वेळापत्रकानुसार चर्चगेटहून विरारला जाण्यासाठी पहाटे 1.15, 1.55,2.25 आणि 3.20 वाजता ट्रेन सोडण्यात येणार आहेत. विरारहून चर्चगेटला येण्यासाठी 00.15, 00.45, 01.40 आणि 3 वाजता विशेष लोकल सोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 9 सप्टेंबरला रात्री उशिरा आणि 10 सप्टेंबरला पहाटे या गाड्या सोडण्यात येणार आहेत. या गाड्या चर्चगेट आणि विरारमध्ये धावतील.