झट नोंदणी पट शादी! ‘स्पेशल मॅरेज ऍक्ट’नुसार एक महिना आधी नोटीस आणि फोटो लावण्याची सक्ती नाही

‘स्पेशल मॅरेज ऍक्ट’नुसार विवाह करणाऱया जोडप्याला एक महिना आधी नोटीस देऊन ती नोटीस बोर्डावर झळकवण्याची तसेच फोटो लावण्याची सक्ती करता येणार नाही, असा निर्णय अलाहाबाद उच्च न्यायालयाने दिलाय. त्यामुळे स्पेशल मॅरेज ऍक्टनुसार ‘झट नोंदणी पट शादी’ होण्याची शक्यता आहे.

हाबेस कॉर्पस ऍक्ट अंतर्गत सुनावणीवेळी न्यायमूर्ती विवेक चौधरी यांच्या खंडपीठाने हा निर्णय दिला आहे. सफिया सुल्तान या मुस्लिम तरुणीने अभिषेक या तरुणाशी विवाह केला. विवाहापूर्वी तिने हिंदू धर्म स्विकारला. मात्र, तिच्या वडिलांनी या विवाहास विरोध केला. सफियाला अभिषेकच्या घरी वडील जाऊ देत नव्हते. या प्रकरणाच्या सुनावणीवेळी न्यायालयाने ‘स्पेशल मॅरेज ऍक्ट’नुसार का विवाह केला नाही? अशी विचारणा केली. त्यावेळी सफिया आणि अभिषेक यांनी ‘स्पेशल मॅरेज ऍक्ट’साठी एक महिना आधी नोंदणी करावी लागते. तसेच विवाह नोंदणी कार्यालयाच्या नोटीस बोर्डावर संबंधितांची माहिती दिली जाते. फोटो लावले जातात. त्यामुळे संबंधित तरुण, तरुणीची माहिती सार्वजनिक होते, अशी अडचण सांगितली. यावेळी न्यायालयाने एक महिना नोटीस देऊन ती जाहीर करण्याची सक्ती करता येणार नाही, असे आदेश दिले.

प्रायव्हसीच्या अधिकाराचे उल्लंघन करू नये

‘स्पेशल मॅरेज ऍक्ट’नुसार विवाह करण्यापूर्वी आपली खासगी माहिती जाहीर करायची का नाही? याचा अधिकार संबंधित तरुण-तरुणीला आहे. त्यामुळे 30 दिवस आधी नोटीस देऊन ती जाहीर करण्याची सक्ती करता येणार नाही. प्रायव्हसीच्या अधिकाराचे उल्लंघन होऊ नये, असे न्यायालयाने सांगितले. n संबंधित तरुण-तरुणीचे वय, इतर पुराव्याची माहिती नोंदी अधिकाऱयाला द्यावी लागेल, असेही न्यायालयाने सांगितले.

आपली प्रतिक्रिया द्या