तू असतेस अग्निहोत्री! जागतिक महिला दिनानिमित्त खास नायगावकरी

तू असतेस अग्निहोत्री
तूच असतेस घर
स्थापत्याचं नेसू बदलतेस
काळाच्या पटरीवर,
चिकणमातीनं लिंपलेल्या
धाब्याच्या घराशी, पाटय़ावर मीठमिरची वाटत, कधी जोत्यावर घट्ट
उभी असतेस चांदईसारखी
कौलारू श्वास घेत
अथवा पावसाळय़ात पत्र्याच्या
ताडताड वाजणाऱया घरात
पाखडतेस पोरकिडय़ांना
राठ हातांनी
तू कुठेही सामानतेस, रो हाऊसमधे
गुंठय़ावर मोकळीढाकळी
आकाश न्याहाळत
कृतज्ञतेची सावली होऊन
तू असतेस अग्निहोत्री
भाकरीचा न संपणारा
वसा घेत तव्यासारखी जाळ रिचवत
तुझ्या हातांना असते, हजार भाकरींची ऊब

आम्ही तुझ्या पोटी एकदाच येतो
आणि तू तर आमच्या पोटात रोजच शिरतेस भाकरी होऊन
तुझी कळण्याची भाकरी पातळ
खुसखुशीत, तुझ्या भाकरीचे कळणे
किती कठीण!
तू स्निग्ध तेलासारखी
पसरतेस भाकरीवर
आम्ही कृष्णपक्षी, तुझ्या भाकरीचा
चंद्र गिळत
तिथी होऊन

खरंच तुझे तिखट गोड लागते
तू कान धरावास, रागे भरावेस
धपाटा घालावा पाठीत
आणि धुसमुसाने तुझ्या पदरात
गालावरून तू बोटे मोडावीस निघतांना
आणि आयुष्याच्या फडक्यात
तुझी भाकर चघळत बसावं

  • अशोक नायगावकर
आपली प्रतिक्रिया द्या