यंदाच्या पोळा सणासाठी परंपरागत झडत्यांसोबत यात सामाजिक, राजकीय आणि आर्थिक अंगही बघावयास मिळत आहे. सोशल मीडियावर या झडत्याची रेलचेल बघावयास मिळत आहे. बैलाविषयी कृतज्ञता व्यक्त करणारा सण म्हणजे पोळा. शेतकऱ्याची व्यथा पोळ्याच्या दिवशी गाण्याच्या झडत्यातून व्यक्त होते.
पूर्व विदर्भात यवतमाळ, वर्धा, चंद्रपूर, नागपूर, भंडारा या जिल्ह्यात पोळ्याच्या दिवशी मैदानात ‘झडत्यांचा’ मुकाबला चांगलाच रंगतो. पोळा सणात बैल, नंदीसाठी म्हटलेल्या गीतांना झडत्या असे म्हणतात.
यवतमाळ जिल्ह्यातील बोरी अरब येथील वऱ्हाडी झडतीकार नितीन वसंतराव कोल्हे यांनी खास झडत्या लिहिल्या आहेत. त्यांच्या झडत्यांची सोशल मीडियावर चांगलीच वातावरण निर्मिती केली आहे. सध्याच्या राजकीय आणि सामाजिक समीकरणाचे प्रतिबिंब त्यावर उमटले आहे.
सलाईन रे सलाईन,
सरकारच सलाईन…!
मुख्यमंत्र्याची आता,
लाडकी झाली हो बहीण..!!
बहिणीच्या लाडात,
लंबा झाला हो दाजी…!!
कापूस सोयाबीन ले नाई भाव,
बहिणीचीच हाय हाजी हाजी..!!
राजकारणाचा रंग,
झाला म्हणते हो गुलाबी..!!
पैश्याचीच माया,
अन पैश्याचीच खराबी..!!
लुटून टाका महाराष्ट्र,
काय ‘सोयर सतुक’ भाऊ..!!
सोयाबीन कापसाले नाई भाव,
आम्ही काय ‘धतूरा’ खाऊ..!!
एक नमन गौरा… पार्वती… हर बोला… हर… हर… महादेव…!!
बदलापुरात जो घृणास्पद प्रकार झाला आहे आणि महाराष्ट्रात स्त्री अत्याचाराच्या घटना समोर येत आहे . याच्या नितीन यांनी झडत्याच्या माध्यमातून खास संदेश दिला आहे .
शंकरा रे शंकरा,
उघड तिसरा डोया…!!
लेकी बाई वर ज्याची नजर,
त्याच्या बुडात घाल गा गोया…!!
मेणबत्ती नको ताई,
तलवार घे हाती…!!
महाकली होऊन,
चिरून टाक छाती…!!
एक नमन गौरा… पार्वती… हर बोला… हर… हर… महादेव…!!
सोशल मीडियावर नितीन यांच्या व्यंगात्मक झडत्याची खासी चर्चा सुरु आहे.