नवदुर्गांच्या कामांचा होणार गौरव, ‘कर्तृत्वाच्या जागर’ मालिकेतून प्रवास उलगडणार

महिलांचे कष्ट, जिद्द आणि वेगळ्या वाटेने चालताना करावा लागणारा संघर्ष अद्याप काही संपलेला नाही. महाराष्ट्रातील अशा नऊ महिलांचा संघर्ष कर्तृत्वाच्या जागर मालिकेतून समोर आणण्यात येणार आहे. ‘श्रीरंग चॅरिटेबल ट्रस्ट’ या संस्थेमार्फत आणि ’फ्रेम मी मीडिया’ यांच्या सहकार्याने आणि कलादिग्दर्शक सुमित पाटील यांच्या संकल्पनेतून नवरात्र निमित्ताने एक वेगळा उपक्रम राबवण्यात आला आहे. मराठी आणि इंग्रजी या दोन्ही भाषेत ही मालिका प्रदर्शित होणार आहे.

या उपक्रमात लांजा येथील असलेल्या संगीत शिक्षिका योगिता तांबे या निसर्गातून होणारा नाद आणि त्यांला पारंपरिक संगीताची जोड देत आपली कला सादर करतात. त्या 70 हून अधिक पारंपरिक वाद्य वाजवतात. त्याचा हा प्रवास यानिमित्ताने सर्वांसमोर आणण्यात येणार आहे. त्यानंतर गड-किल्ले सर करणाऱ्या सुवर्णा वायंगणकर, गड-किल्ले संवर्धनासाठी आणि त्याच सोबत नऊवारी साडी नेसून वेगवेगळे किल्ले सर करीत आपली संस्कृती सुद्धा जपत असून त्यांचा संघर्ष या मालिकेतून मांडण्यात येणार आहे. माया शृंगारे यांचा शेतीतील प्रवास देखील पहायला मिळणार आहे. दशक्रिया विधी करणाऱया श्रद्धा कदम यांना नेमक्या कोणकोणत्या अडचणी आल्या हे देखील पहायला मिळणार आहे. त्याशिवाय श्रुतिका पालकर यांचा चित्रकलेचा, नंदा गावडे या अन्नपूर्णा स्त्रीचा, आरती परब यांनी फुगडी या आपल्या संस्कृती आणि परंपरा जपणाचा केलेला प्रयत्न. ‘कळसुत्री’ आणि ‘चित्रकथी’ रूपातील बाहुल्यांचे खेळ करून समाज प्रबोधनाचा वसा जपणारी तनुश्री गंगावणे आणि वृध्दाश्रम चालविणाऱया श्रेया बिर्जे यांचा संघर्षमय प्रवास या मालिकेत पाहता येणार आहे.

या मालिकेचे दिग्दर्शन सुमीत पाटील व किशोर नाईक यांनी सांभाळले आहे. छायाचित्रण व संकलन मिलिंद आडेलकर, आरती कादवडकर, मकरंद नाईक, संकेत जाधव, यांनी सांभाळले आहे. लेखन वेद दळवी, कृष्णा कोरगावकर यांनी केले आहे. तर संकेत कुडाळकर, साक्षी खाडय़े, धीरज कादवडकर, मंगल राणे, अभिषेक तेंडुलकर, भरत शिंदे यांचे विशेष सहकार्य लाभले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या