पावसाळ्यात वेगाशी स्पर्धा नको, टायर करेल घात

33

दीपक पवार । मुंबई

पावसाळय़ाचे दिवस आहेत. विकेण्डला लोणावळा, खंडाळा किंवा एखाद्या धबधब्यावरचा पिकनिक स्पॉट गाठण्यासाठी भटक्यांची लगबग असेल. मस्त रिमझिम पाऊस आणि वाऱयाच्या वेगावर स्वार होऊन धूम स्टाईलने गाडी पळवण्याचा मूड होत असेल तर जरा थांबा… कारण, राज्यात सर्वाधिक अपघात टायर फुटून झाले असून पावसाळय़ात या अपघातांचे प्रमाण अधिक असल्याचे समोर आले आहे.

अनेकांना यावर विश्वासच बसत नसेल. पावसाळय़ात टायर फुटण्याचा काय संबंध? असा सवालही त्यांच्या मनात आला असेल. पण पावसाळा असला तरीही जोरजोरात टायर फिरल्यानंतर आणि सतत खड्डय़ांमध्ये आदळल्यानंतर टायरच्या आतील हवा प्रसरण पावते आणि टायर फुटतो असेही समोर आले आहे. मुंबई-पुणे एक्प्रेस वेवरदेखील टायर फुटून झालेल्या अपघातांचे प्रमाण अधिक आहे, अशी माहिती मुंबई-पुणे एक्प्रेस वेच्या वाहतूक विभागातील अधिकाऱ्यांनी दिली.

एकाच्या चुकीमुळे अनेकांचे प्राण धोक्यात

एका वाहनचालकाच्या चुकीमुळे एका लेनमध्ये वाहन चालवणाऱयांनाही नाहक प्राण गमवावे लागतात. टायर फुटून एखादी गाडी दुभाजक तोडून दुसऱया गाडीवर जाऊन आदळल्यामुळेही मोठय़ा प्रमाणावर अपघात झाले आहेत. यात चूक नसणाऱया वाहनामधील अनेकांचे प्राण गेल्याच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे वाहनचालकांनी गाडीचे टायर वारंवार तपासायला हवेत, असे मुंबई-पुणे एक्प्रेस वेच्या वाहतूक विभागाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जनार्दन पाटील यांनी सांगितले.

मुंबई-पुणे महामार्गावर वेगमर्यादा घालूनही अपघात

मुंबई-पुणे एक्प्रेस वेवर प्रति तास ८० किलोमीटर वेगमर्यादा घालण्यात आली आहे. बेदरकारपणे गाडी चालवण्यामुळे होणारे अपघात टाळण्यासाठी मार्च महिन्यात हा निर्णय घेण्यात आला. परंतु अनेक वाहनचालक हा नियम पाळत नाहीत. त्यामुळेही अपघात होण्याचे प्रमाण वाढले आहे. यात टायर फुटून अपघात होण्याचे प्रमाण अधिक असल्याचे मुंबई-पुणे एक्प्रेस वेच्या वाहतूक विभागातील अधिकाऱयांनी सांगितले.

दृश्यमानता नसूनही बेदरकारपणे वाहन चालवणे

पावसाळय़ात घाटात दृश्यमानता कमी होते. परंतु अनेक वाहनचालक अतिआत्मविश्वास बाळगतात. या आत्मविश्वासाच्या जोरावर ते बेदरकारपणे वाहन चालवतात. त्यात टायरची अवस्था वाईट असेल तर टायर फुटून अपघात होण्याची शक्यता वाढते.

गेल्या २ महिन्यांत झालेले भीषण अपघात

२७ जून रोजी संगमेश्वरमध्ये इनोव्हा कारचा टायर फुटून अपघात. कार पुलावरून नदीत कोसळली. तीन प्रवासी ठार.२४ जून रोजी मुंबई-आग्रा महामार्गावर एका क्रुझर जीपचा टायर फुटून अपघात झाला. ही जीप दुभाजक तोडून दुसऱया बाजूने येत असलेल्या बसला जोरात धडकली. या घटनेत जीपमधील आठ जण जागीच ठार तर आणखी दहा जण जखमी झाले.२५ जून रोजी कोल्हापूर-बंगलोर महामार्गावर मालवाहू बोलेरोचा टायर फुटला. या भरधाव गाडीची टेम्पोला धडक बसून दोन्ही वाहनांमधील पाच जण जागीच ठार झाले.जूनच्या सुरुवातीलाच नागपूर-बोरी-तुळजापूर राष्ट्रीय महामार्गावर कार आणि ट्रकचा भीषण अपघात झाला. पहाटेच्या सुमारास झालेल्या या अपघातात दहा जणांचा मृत्यू झाला.८ जून रोजी मध्य प्रदेशातील उज्जेन येथून कल्याणकडे परतणाऱ्या भाविकांची मिनी बस टायर फुटून रस्त्याच्या बाजूला उभ्या असलेल्या ट्रकवर आदळली. या अपघातात दहा जण जागीच ठार तर १४ जण गंभीर जखमी झाले.२ मे रोजी इंदापूरजवळ कारचा टायर फुटून ती दुभाजकावरून जाऊन आदळली. या घटनेमध्ये १३ वर्षांच्या मुलीचा मृत्यू झाला.९ मे रोजी मुंबई-पुणे एक्प्रेस वेवर कामशेत बोगद्यात एका भरधाव कारचे टायर फुटून झालेल्या अपघातात दोन जण जागीच ठार झाले. या कारचे चारही टायर फुटले होते.१९ मे रोजी पुणे-सोलापूर महामार्गावर स्कॉर्पियो कारचा टायर फुटून एकाच कुटुंबातील पाच जणांचा जागीच मृत्यू झाला.१८ मे रोजी इंदापूर येथे स्कॉर्पियो गाडीचा टायर फुटून झालेल्या अपघातात पाच जणांचा जागीच मृत्यू झाला.

यामुळे घात करतोय टायर

– अनेक वाहनचालक टायर चार ते पाच वर्षे बदलत नाहीत. मेण्टेनन्सचा खर्च कमी करण्यासाठी ते बेजबाबदारपणे वागतात. परिणामी टायरचा दर्जा घसरतो आणि अपघात होतात.

– वाहनांचा वेग आणि टायरचे सततचे घर्षण. त्यात जुने झालेले टायर यामुळे ते फुटण्याचा धोका वाढतो.

– गोटा झालेले किवा नक्षी नसलेले टायर असतील तर वाहन स्लीप होण्याची भीती असते. तसेच टायर फुटण्याचीही शक्यता असते.

अपघात टाळण्यासाठी कोणती काळजी घ्याल

– वेगावर मर्यादा ठेवा.

– दूरवरच्या प्रवासाला जाण्याआधी टायर तपासून घ्या.

– गोटा झालेले किंवा नक्षी गायब झालेले टायर बदला.

– चांगल्या कंपनीच्या टायर्सनाच प्राधान्य द्या.

– ठराविक कालावधीनंतर टायर सातत्याने मॅकेनीककडून तपासून घ्या.

आपली प्रतिक्रिया द्या