स्पाइन फाऊंडेशनच्या मदतीसाठी माइंडस्केप्स, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी  दिल्या शुभेच्छा

देशातील ख्यातनाम स्पाइन सर्जन डॉ. शेखर भोजराज यांच्या कलाकृतींचे ‘माइंडस्केप्स’ प्रदर्शन 18 आणि 19 जून रोजी नेहरू सेंटर, वरळी येथील वारली हॉलमध्ये झाले.  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि सौ. रश्मी ठाकरे यांनी प्रदर्शनाला भेट देऊन शुभेच्छा दिल्या. स्पाइन फाऊंडेशनच्या मदत निधीसाठी या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले.

‘माइंडस्केप्स’ प्रदर्शनात डॉ. शेखर भोजराज यांनी साकारलेल्या 80 हून अधिक लँडस्केप्स चित्रांचा समावेश करण्यात आला. माइंडस्केप्स म्हणजे डॉ. भोजराज यांनी साकारलेल्या लँडस्केप्सचा हा एक कलात्मक प्रवास होता. प्रदर्शनाला रसिकांचा चांगला प्रतिसाद लाभला.

गरीब, गरजूंवर मोफत उपचार

स्पाइन फाऊंडेशनची स्थापना 1998 मध्ये डॉ. शेखर भोजराज आणि डॉ. शिल्पा भोजराज यांनी केली. देशाच्या अतिदुर्गम भागातील गरीबांना शस्त्र्ाक्रियेसह मणक्याच्या आजारावर दर्जेदार उपचार प्रदान करणे हे त्यांचे ध्येय आहे. स्पाइन फाऊंडेशन मुंबईतील व्ही. एन. देसाई रुग्णालयात मणक्याच्या आजारावर मोफत उपचार करते. त्याशिवाय महाराष्ट्रातील गडचिरोली, कोल्हापूर, नंदुरबार, अकोला, अंबाजोगाई, रत्नागिरी, धुळे आणि संभाजीनगर, गुजरातमधील धरमपूर, झारखंडमधील रांची, उत्तराखंडमधील डेहराडून आणि तामीळनाडूमधील सितीलिंगी येथे ग्रामीण लोकांसाठी स्पाइन केअर क्लिनिकद्वारे उपचार केले जातात. स्पाइन फाऊंडेशनने देशभरात आयोजित केलेल्या अनेक शिबिरांमध्ये हजारो रुग्णांवर मणक्याचा मोफत उपचार आणि शेकडो शस्त्र्ाक्रिया केल्या आहेत.