भगवद्गीता जयंती: एक अलौकिक स्फूर्तिदिन

3091

>> डॉ. साहेबराव निगळ (प्रपाठक, तत्त्वज्ञान विभाग, मुंबई विद्यापीठ)

अनेक सत्पुरुषांचे, संतांचे, महापुरुषांचे व राष्ट्रपुरुषांचे जन्मदिन पवित्र व फलदायी स्मृतिदिन म्हणून साजरे केले जातात. तसेच स्वातंत्र्यदिनाचे सोहळेही साजरे केले जातात. परंतु एका हजारो वर्षांपूर्वीच्या एका ग्रंथाचा जन्मदिन आजही पाळला जातो. असे भाग्य लाभलेला ग्रंथ म्हणजे श्रीमद्भगवद्गीता होय. या ग्रंथात योगेश्वर श्रीकृष्ण व महाभारतातील युद्धातील पांडवपक्षाकडील महान योद्धा अर्जुन यांच्यात झालाला नैतिक व आध्यात्मिक संवाद आलेला आहे.

वेदोत्तर काळातील संस्कृत साहित्यात अनेक गीतांचा उल्लेख आहे. उदाहरणार्थ उद्धवगीता, अनुगीता, शिवगीता, गणेशगीता, अष्टावक्रगीता वगैरे या गीतांमध्येही हिंदुस्थानी तत्त्वज्ञानातील वेदान्त विचारांचा ऊहापोह केलेला आहे. हेही ग्रंथ तत्त्वज्ञानाच्या दृष्टीने महत्त्वाचे व मोठे आहेत. असे असूनही महाभारत या महाकाव्यात आलेल्या भगवद्गीता या ग्रंथाचीच जयंती आजतागायत साजरी केली जाते. याची अनेक कारणे असू शकतात. ज्या प्रसंगात वा परिस्थितीत भगवद्गीता जन्माला आली तो प्रसंग फारच नाट्यमय, रोमांचकारी व नैतिक समस्यात्मक आहे. या ग्रंथाचा जन्म युद्धभूमीवर झाला. कारण श्रीकृष्ण व अर्जुन यांच्यातील हा ‘धर्मसंवाद’ युद्धभूमीवर घडला. अर्जुनाला स्वतःच्या मरणाची भीती मुळीच नव्हती. त्याच्या भीतीचे उगमस्थान ‘नैतिक समस्या’ होती.

कौरवांचा पक्ष हा शत्रूपक्ष होता. या पक्षात आजच्या भाषेत सांगावयाचे झाले तर पूजनीय भीष्माचार्य व पूज्य द्रोणाचार्य होते. भगवद्गीतेत अर्जुन म्हणतो, ‘ही मंडळी मला ‘पूजार्ह’ (पूजा करण्यायोग्य) आहेत. ज्यांची मी पूजा केली पाहिजे अशा वंदनीय, पूजनीय व्यक्तींना मारणे नैतिकदृष्ट्या योग्य आहे काय? हा त्याचा मूलभूत प्रश्न आहे. या सर्व बाबींचा विचार याअगोदर झालेला होता. कुणाशी आपल्याला लढावयाचे आहे याची जाणीव अर्जुनाला होती. परंतु प्रत्यक्ष युद्धभूमीवर कौरव – पांडव उभे ठाकले असता समोर अर्जुनाला भीष्य व द्रोण व इतर आप्तेष्ट दिसले आणि अर्जुनाच्या सदसद्विवेक बुद्धीत नैतिक प्रश्नांनी काहूर निर्माण केले.

मानवी जीवनात अशा समस्या नेहमीच निर्माण होतात. अशावेळी जातीयता व रक्तसंबंध यासारखे कर्तव्यविन्मुख करणारे विचार मनात उद्भवतात. अशा प्रसंगी काय करावे? सज्जन माणूस गोंधळून जातो. आपल्या ध्येयाचे, प्रेरणांचे  व कर्तव्याचे विस्मरण होते. भलीभली माणसेसुद्धा अशाप्रसंगी नैतिकदृष्ट्या चुकीचे निर्णय घेतात. अर्जुन विचारपूर्वक व निर्धारपूर्वक रणभूमीवर आलेला होता. परंतु नैतिकदृष्ट्या जटिल परिस्थितीमुळे तो गोंधळून गेला. पक्षाघात झालेल्या रुग्णांचे हात लुळे पडतात तशी अर्जुनाची मानसिक स्थिती झाऴी व या शूरवीराच्या हातातील गांडीव धनुष्य हातातून गळून पडले (गांडीव संस्रते हस्तात…) हे धनुष्य त्याने खाली टाकले व फेकले नव्हते. त्यातून योगेश्वर कृष्ण हा सारथी असल्यामुळे युद्धभूमीवर दोघांमध्ये प्रश्नोत्तरी झाली. त्या प्रश्नोत्तरित गीता जन्माला आली. या संवादात जी चर्चा झाली तिच्या शेवटी श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणतात, ‘यथेच्छसि तथा कुरू’  हा खरा तात्त्विक संवाद आहे. साधकबाधक चर्चा करून अर्जुनाच्या प्रश्नांना समर्पक उत्तरे देऊन श्रीकृष्ण अर्जुनाला निर्णय स्वातंत्र्य देतात. आणि अर्जुन पडलेले गांडीव धनुष्य उचलून लढण्याचे कर्तव्य पार पाडण्याचा निर्णय घेतो व पुढील महाभारत घडले.

ऐतिहासिक दृष्टिकोनातून भगवद्गीता:

हिंदूंच्या जवळजवळ सर्व वेदान्ताचार्यांना भगवद्गीता मान्य आहे, तिचे श्रेष्ठत्वही मान्य आहे. वेदविचारांचे समाजीकरण न झाल्यामुळे वेदान्तविचारही लोकांना माहीत नाहीत. शंकराचार्यादी सर्व आचार्यांनी भगवद्गीता हा ग्रंथ वैदिक विचारांचा सारभूत ग्रंथ आहे असे उद्घोषित केलेले आहे. आद्य शंकराचार्यांनी नवव्या शतकाच्या पूर्वार्धात ‘प्रस्थानत्रयी’ ही संकल्पना मांडली. या प्रस्थानत्रयीत उपनिषदे (श्रुतिप्रस्थान), ब्रह्मसूत्रे (न्यायप्रस्थान) व भगवद्गीता (स्मृतिप्रस्थान) या तीन ग्रंथांचा त्यांनी समावेश केला. त्यांनी या तिन्ही ग्रंथांवर भाष्ये लिहिली. या तीन ग्रंथांमध्ये भगवद्गीतेला अनन्यसाधारण स्थान आहे. कारण या आचार्यांनी योगेश्वर कृष्णाला पूर्णावतार म्हणून मान्यता दिलेली आहे. दुर्दैवाने आचार्यांच्या मठाधिपतींनी व शिष्यांनी समाजात भगवद्गीतेचा प्रसार केऴा नाही. वेदबंदी, व्यवसायबंदी, सिंधूबंदी, रोटीबेटी बंदी, स्पर्शबंदी (अस्पृश्यता), सिंधूबंदी, बहुजनांसाठी व महिऴांसाठी शिक्षणबंदी इ. बंदींमुळे समाज वैदिक विचारांपासून वंचित राहिला.

१३ व्या शतकाच्या उत्तरार्धात एक आश्चर्यकारक घटना घडली. नाथसंप्रदायातील गहिनीनाथांकडून निवृत्तीनाथांना अनुग्रह मिळाला. गहिनीनाथांनी निवृत्तीनाथांना कृष्णभक्तीचा प्रसार करण्याचा उपदेश केला. ज्ञानेश्वरांनी पैठण येथे भगवद्गीतेवर काही प्रवचने दिली होती. निवृत्तीनाथांनी ज्ञानेश्वरांना भगवद्गीतेवर भाष्य लिहिण्यास प्रवृत्त केले. ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी ही भावार्थदीपिका गीतेवरील भाष्य प्राकृत मराठी भाषेत लिहिली. प्राकृत भाषेतील हे पहिले भाष्य होय. या भाष्याची निर्मिती हे हिंदूंच्या धार्मिक व सांस्कृतिक इतिहासातील क्रांतिकारी घटना होती. पुढील काळात अनेकांनी भगवद्गीतेवर मराठीत भाष्ये लिहिली. विशेष म्हणजे ज्ञानेश्वरांच्या मते भगवद्गीतेला वेदांसारखेच प्रामाण्य आहे. २० व्या शतकात अनेक विद्वानांनी, विचारवंतांनी, वेदान्तचार्यांनी मराठी, हिंदी, इंग्रजी अशा अनेक भाषांमध्ये गीतेवर भाष्ये लिहिली.

भगवद्गीतेचा विशेष संदेश :

कर्तव्यच्युती वा कामचोरी ही हिंदुस्थानीयांची एक मोठी समस्या होऊन बसली आहे. अध्यात्मातही निवृत्तीमार्गाला (संन्यासमार्गाला) अधिक प्राधान्य दिले जाते. भगवद्गीतेने ज्ञान, भक्ती व कर्म यांचा सुरेख समन्वय साधला आहे. तसेच प्रवृत्ती व निवृत्ती यांचाही सुमेळ घडवून आणला आहे. स्वतः श्रीकृष्ण हे निष्काम कर्मयोगाचे आचरण करणारे असल्यामुळे भगवद्गीता हा ग्रंथ, स्वामी विवेकानंदांच्या भाषेत सांगावयाचे झाल्यास व्यवहार्य वेदांताचा (Practical Vedanta) मार्गदर्शक ग्रंथ आहे. एक सत्य गीतेने ठासून सांगितले आहे की कुणीही कर्म टाळू शकत नाही. (नहि कश्चित क्षणमपि, जातु तिष्ठति अकर्मकृत) कर्म केले की त्याचा परिणाम होणारच. परंतु कर्मकर्त्याने कर्मफळावर लक्ष ठेवू नये. (कृपणः फलेहतवः) मग कर्मे कोणत्या भूमिकेतून करावीत? ‘ईश्वरार्थ कर्म (Duty for Deity’s sake) हा गीतेचा विशेष संदेश आहे. हाच खरा कर्मयोग होय. आणि हा ईश्वर सर्वाठायी आहे. कर्तव्यकर्माचा त्याग न करता कर्मयोगाचा समजून उमजून अवलंब केल्यास साधक ईश्वरप्राप्ती वा मुक्ती या आध्यात्मिक शिखरावर पोहोचू शकतो. सोप्या भाषेत सांगावयाचे झाल्यास ईश्वराला आपली कर्मरूपी फुले वाहा. हीच खरी भक्ती होय.

जागतिक दृष्टिकोनातून गीता :

आमच्या अधिकृत गुरूंनी या मार्गाचा अवलंब केला नाही. त्यामुळे अस्पृश्यतेसारख्या अनैतिक व घातक रूढी हिंदुस्थानातील लाखो खेड्यांपर्यंत पोहोचल्या. परंतु वैदिक विचार वा गीतेचे विचार मात्र पुस्तकातच राहिले. १८४ साली न्या. सर विल्यम जोन्स हे न्यायाधीश म्हणून कलकत्त्याला आले. ते संस्कृत भाषाप्रेमी होते. त्यांनी रॉयल एशियॅटिक सोसायटी काढली व आशियाच्या व विशेषतः हिंदुस्थानचा भूतकाळ शोधण्याचा प्रयत्न सुरू झाऴा. १७९२ च्या सुमारास त्यांनी गीतेचे पहिले इंग्रजी भाषांतर केले. हे भाषांतर इंग्लंडला पोहोचले. १९ व्या शतकाच्या उत्तरार्धात, प्रसिद्ध अमेरिकन विचारवंत इमरसन यांनी लंडनसा भेट दिली. या भेटीत ते ब्रिटिश विचारवंत कार्लाईल यांना भेटले. निरोप घेताना कार्लाईल यांनी इमरसन यांना गीतेच्या इंग्रजी आवृतीची भेट दिली. इमरसन यांचे शिष्य हेन्री थोरो यांच्यापर्यंत गीता पोहोचसी. थोरो म्हणतात, ‘मी रोज सकाळी भगवद्गीतेच्या विचारांनी माझ्या बुद्धीला स्नान घालतो.’ अशी ही भगवद्गीता आता जागतिक होत आहे. भगवद्गीता खरेतर जीवनग्रंथ आहे. त्याही पुढे जाऊन सांगावयाचे झाल्यास समग्र श्रीकृष्ण चरित्र हेच भगवद्गीतेवरील एक उत्कृष्ट भाष्य आहे. भगवद्गीता ही योगेश्वर कृष्णांची वाङ्मयीन मूर्ती आहे. सामान्य कर्मसुद्धा त्याच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन व त्याच्या मुळाशी असलेली भूमिका उदात्त केल्यास तेच कर्म पूजा होऊ शकते. गीतेचा संदेश स्फूर्तिदायी, उत्साहवर्धक, विधायक व जीवनवादी आहे.

‘मूर्ती लहान, कीर्ती महान’ या न्यायाने हा ग्रंथ आकाराने छोटा असला तरी त्यातील विचार जीवनदायी व विजीगिषु आहेत. विचार ही मोठी शक्ती आहे. गीता ऐकण्यापूर्वी अर्जुनाच्या मनात एक विचार आला व अर्जुन गर्भगळित झाला. श्रीकृष्णाशी संवाद झाला व दुसऱ्या विचाराने अर्जुनाला स्फूर्ती मिळाली, उत्साह मिळाला. त्याची कर्तव्यनिष्ठा जागृत झाली व अर्जुन लढण्याचे कर्तव्य पार पाडण्यास उद्युक्त झाली. विधायक विचारांमध्ये जबरदस्त शक्ती असते. असे स्फूर्तिदायक व चैतन्यदायी विचारांचे भांडार म्हणजे भगवद्गीता. म्हणूनच प्रतिपक्षाचा प्रतिनिधी असलेला संजय गीतेच्या शेवटच्या श्लोकात त्याच्या राजकीय बॉसला निर्धारपूर्वक सांगतो – जिथे योगेश्वर कृपा व धनुर्धारी (कर्तव्यपरायण) अर्जुन आहे तिथे विजय व यश निश्चित आहे.

आपली प्रतिक्रिया द्या