रस्त्यावर थुंकल्यास एक हजार दंड

560

‘कोरोना’चा वाढता प्रभाव आणि संसर्गजन्य आजार रोखण्यासाठी पालिकेने कठोर उपाययोजना करण्यास सुरुवात केली असून रस्ते आणि सार्वजनिक ठिकाणी थुंकणाऱयांना एक हजाराचा दंड करण्याचा निर्णय घेतला आहे. याआधी हा दंड 200 रुपये होता. ‘कोरोना’बरोबरच टीबीसारख्या आजारांसह संसर्गजन्य आजारांना आळा घालण्यासाठी पालिका आयुक्त प्रवीण परदेशी यांनी हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.

मुंबईतील गर्दीमुळे ‘कोरोना’सह संसर्गजन्य आजारांच्या फैलावाला पोषक वातावरण निर्माण होते. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारच्या निर्देशानुसार पालिका आयुक्तांनी महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यास सुरुवात केली आहे. यामध्ये बेजबाबदारपणे रस्त्यावर थुंकणाऱयांना आळा घालण्यासाठी दंडाच्या रकमेत पाचपट वाढ करण्यात आली आहे. पालिका आयुक्तांच्या निर्देशानुसार याआधी ‘कोरोना’वर उपचार सुरू असलेले कस्तुरबा रुग्णालय, केईएम, सेव्हन हिल्स रुग्णालय आणि क्वारेंटाइन, आयसोलेशन सेंटर परिसरातील वाहतुकीवर निर्बंध घालण्यात आले आहेत. याशिवाय मुंबईतील शाळा, मॉल, जिम, स्विमिंग पूल, चौपाटय़ाही बंद करण्यात आल्या आहेत. दरम्यान, अत्यावश्यक सेवा मात्र सुरूच ठेवणार असल्याचेही पालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले.

500 जण ‘होम क्वॉरेंटाइन’मध्ये

मुंबई विमानतळावर पालिका, विमानतळ प्रशासन आणि राज्य सरकारच्या डॉक्टर, मेडिकल स्टाफकडून लाखो प्रवाशांची तपासणी करण्यात येत आहे. यामध्ये संशयितांना थेट कस्तुरबा रुग्णालयात आणून तपासणी करण्यात येत आहे. यामध्ये सद्यस्थितीत एकूण 74 जण कस्तुरबा रुग्णालयात देखरेख-उपचाराखाली आहेत. शिवाय पालिकेच्या कस्तुरबा रुग्णालयाच्या ओपीडीमध्ये 23 जानेवारीपासून आतापर्यंत 2758 जणांची तपासणी करण्यात आली आहे. तर गेल्या 24 तासांत 511 जणांची कस्तुरबाच्या ओपीडीत तपासणी करण्यात आली आहे. तर सौम्य लक्षणे आढळलेल्या 500 जणांना ‘होम क्वारेंटाइन’मध्ये ठेवण्यात आले असून त्यांच्यावर पालिकेच्या तज्ञ डॉक्टरांकडून देखरेख ठेवण्यात येत आहे.

58 संशयित रुग्ण

राज्यात आज 58 संशयित रुग्णांना दाखल करण्यात आले. राज्यात आजपर्यंत 1227 प्रवासी आले आहेत. 18 जानेवारीपासून ताप, सर्दी, खोकला अशी लक्षणे आढळल्याने राज्यातील वेगवेगळ्या विलगीकरण कक्षात आज 958 जणांना दाखल करण्यात आले. दाखल करण्यात आलेल्यांपैकी 865 जणांचे प्रयोगशाळा नमुने निगेटिव्ह आले आहेत तर 42 जणांचे नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.

शासकीय, खासगी रुग्णालयांतील खाटांची सुविधा

पालिकेच्या कस्तुरबा आणि अंधेरीतील सेव्हल हिल्स रुग्णालयांसह पाच हॉटेल्समध्ये पालिकेने देखरेख-उपचारांची सुविधा उपलब्ध केली आहे. याशिवाय शासकीय, खासगी रुग्णालयांमध्ये जसलोक रुग्णालय – 5 खाटा, एच. एन. रिलायन्स रुग्णालय – 2 खाटा, हिंदुजा रुग्णालय – 20 खाटा, कोकीलाबेन रुग्णालय – 17 खाटा, रहेजा रुग्णालय – 12 खाटा, जगजीवन राम वेस्टर्न रेल्वे रुग्णालय – 10 खाटा, गुरुनानक रुग्णालय – 2 खाटा, सेंट एलिझाबेथ रुग्णालय – 2 खाटा, मुंबई रुग्णालय – 4 खाटा आणि लीलावती रुग्णालयात 15 खाटा उपलब्ध करून दिल्या आहेत.

खासगी प्रयोगशाळेत ‘कोरोना’ चाचणी

  • ‘कोरोना’ चाचणी वेगाने होण्यासाठी मुंबईतील खासगी प्रयोगशाळांमध्येही ही चाचणी करण्याची व्यवस्था करण्यात येणार असल्याची माहिती पालिकेच्या उपकार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. दक्षा शहा यांनी दिली. आंतरराष्ट्रीय प्रवास केलेल्या आणि सौम्य लक्षणे आढळलेल्यांपैकी 10 जणांना सेव्हन हिल्स रुग्णालयात तर 10 जणांना मिराज हॉटेलमध्ये विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले आहे.
  • दरम्यान, पालिकेच्या परळ येथील केईएम रुग्णालयातही एक-दोन दिवसांत ‘कोरोना चाचणी’ करण्यात येणार आहे. या ठिकाणी इतर ठिकाणाहून आणलेल्या सॅम्पलची ‘कोरोना तपासणी’ होणार आहे. त्यामुळे या ठिकाणी संशयित किंवा लक्षणे असलेल्या आयसोलेशन सेंटरमधून आलेल्या रुग्णांनी गर्दी करू नये, असे आवाहन पालिकेने केले आहे.

…तर खासगी कंपन्यांना दंड

राज्य सरकारच्या निर्देशानुसार खासगी कंपन्यांनी 50 टक्के कर्मचाऱयांनाच कामावर बोलवावे, शक्य असल्यास घरातून काम करण्याची मुभा द्यावी असे निर्देश परिपत्रक काढून पालिका आयुक्तांनी दिले आहेत. तरीदेखील मुंबईत गर्दी आवश्यक प्रमाणात कमी झाल्याचे निदर्शनास येत नाही. या पार्श्वभूमीवर खासगी कंपन्या 50 टक्के कर्मचारी बोलावण्याचे निर्देश पाळत आहेत की नाहीत यावर पालिका प्रशासनाकडून नजर ठेवली जाणार आहे. यामध्ये कंपन्यांनी पालिकेचे आदेश पाळले नसल्याचे समोर आल्यास दंडात्मक कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा पालिका प्रशासनाकडून देण्यात आला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या