
दोन वेळच्या जगज्जेत्या अर्जेंटिनाने कतारमध्ये सुरू असलेल्या फिफा वर्ल्ड कपमधील बाद फेरीच्या आशा जिवंत ठेवल्या आहेत. सलामीच्या लढतीत सौदी अरेबियाकडून झालेल्या धक्कादायक पराभवानंतर अर्जेंटिनाने मेक्सिकोचा 2-0 गोल फरकाने पराभव करत स्पर्धेत पुनरागमन केले. स्टार खेळाडू लियोनल मेस्सीची जादू या लढतीत चालली. त्याने एक भन्नाट मैदानी गोल केला, तर चतुराईने चेंडू पास करून दुसऱया गोलसाठीही योगदान दिले.
सौदी अरेबियाविरुद्धच्या अनपेक्षित पराभवामुळे अर्जेंटिना संघ दडपणाखाली होता. कारण वर्ल्ड कपमधील आव्हान टिकवून ठेवण्यासाठी अर्जेंटिनाला विजयाची गरज होती. मेक्सिकोने पूर्वार्धात अर्जेंटिनाला गोलरहीत बरोबरीत रोखण्यात यश मिळविले होते. मात्र मध्यंतरानंतर मेस्सीने 64व्या मिनिटाला एंजेल डी मारियाच्या पासवर पेनल्टी बॉक्सच्या बाहेरून सुरेख गोल करत अर्जेंटिनाचे खाते उघडले. त्यानंतर युवा खेळाडू एंझो हर्नांडेझने 87व्या मिनिटाला गोल करत अर्जेंटिनाची आघाडी भक्कम केली. मेस्सीच्या एका छोटय़ा पासवर फर्नांडोने चेंडू गोलपर्यंत नेत गोल केला. आता बाद फेरी गाठण्यासाठी अर्जेंटिनाला 1 डिसेंबरला पोलंडविरुद्ध होणारी अखेरची गटफेरी लढत जिंकावी लागणार आहे.
मेस्सीची मॅराडोनाशी बरोबरी
लियोनल मेस्सीने या लढतीत सर्वकालीन महान फुटबॉलपटू डिएगो मॅराडोना याच्या वर्ल्ड कपमधील 21 सामन्यांच्या विक्रमाची बरोबरी केली. मेस्सीचा हा 21वा वर्ल्ड कप सामना होता. याचबरोबर मेस्सीचा हा वर्ल्ड कपमधील आठवा गोल ठरला. शिवाय अर्जेंटिनाचा मेक्सिकोवरील हा सलग 11वा विजय होय. 18 वर्षांपूर्वी म्हणजे 2004मध्ये कोपा अमेरिका स्पर्धेत मेक्सिकोने अर्जेंटिनाला 1-0 गोल फरकाने हरवले होते. त्यानंतर मेक्सिकोला परत कधीच अर्जेंटिनावर विजय मिळवता आला नाही. वर्ल्ड कपमध्ये अर्जेंटिनाचा मेक्सिकोवरील हा चौथा विजय होय.
मेक्सिकोच्या चाहत्यांकडून मेस्सीला शिवीगाळ
सौदी अरेबियाने अर्जेंटिनाचा पराभव केल्यानंतर दुसऱया दिवशी दोहा येथील अल विद्दा पार्कमध्ये अर्जेंटिना आणि मेक्सिको संघांच्या चाहत्यांमध्ये बाचाबाची झाली होती. येथे मेक्सिको संघाचे चाहते एक व्हिडीओ बनवत होते ज्यात ते मेस्सीला शिवीगाळ करत होते. हे ऐकल्यानंतर मेस्सीचे चाहते भडकले अन् एकमेकांवर धावून गेले होते. त्यामुळे अर्जेंटिना आणि मेक्सिको दरम्यानच्या लढतीला अत्यंत कडेकोट बंदोबस्त होता.