Shikhar Dhawan शिखर धवनचा खासगी आयुष्याबाबत धक्कादायक गौप्यस्फोट, घटस्फोटावरही सोडले मौन

हिंदुस्थानी संघाचा सलामीवीर खेळाडू शिखर धवन क्रिकेटबरोबरच खासगी आयुष्यामुळे चर्चेत आला आहे. पत्नी आयेशा मुखर्जीपासून विलग होत असल्याच्या अनेक बातम्या येत होत्या. त्यावर एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्याने घटस्फोटाबाबत मौन सोडत खासगी आयुष्याबाबत अनेक धक्कादायक खुलासे केले आहेत.

हिंदुस्थानी संघाचा सलामीवीर खेळाडू शिखर धवन संघातून बाहेर पडला असला तरी तो लवकरच आयपीलमधील पंजाब किंग्जच्या सराव शिबिरात सहभागी होणार आहे. या मोसमात धवन पंजाब किंग्जचे नेतृत्व करणार आहे.  शिखर धवनने नुकतेच एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत क्रिकेट करिअर, भविष्यातील योजना आणि वैयक्तिक आयुष्याशी संबंधित अनेक मुद्द्यांवर मोकळेपणाने संवाद साधला. ज्यामध्ये त्याने घटस्फोटाबाबतही खुलासा केला आहे.

घटस्फोटाबाबत बोलताना धवन म्हणाला की, मी यात अपयशी ठरलो, मला त्या क्षेत्राचा अंदाज नव्हता. आज तुम्ही जे क्रिकेटबाबत मला विचारता तेच 20 वर्षांपूर्वी मला काही विचारले असते तर कदाचित ते मला जमले नसते. त्यामुळे हा एक अनुभवाचा भाग आहे. त्यामुळे एक-दोन वर्ष एखाद्या माणसासोबत घालवा आणि त्यानंतर दोघांचे विचार जुळतात की नाही ते पाहा.

तो पुढे म्हणाला की , ‘लग्न हा देखील माझ्यासाठी एक सामना होता. सध्या माझ्या घटस्फोटाचा खटला सुरू आहे, तो पूर्ण झाल्यावर जेव्हा लग्न करायचे आहे, त्यावेळी मी निपुण असेन आणि माझ्यासाठी योग्य जोडीदाराची निवड करेन.  ज्याच्यासोबत माझे संपूर्ण आयुष्य काढू शकेन. जेव्हा लग्न केले त्यावेळी 26-27 वर्षांचा होतो आणि खेळत होतो, तेव्हा माझे कोणासोबतही संबंध नव्हते. पण जेव्हा मी प्रेमात पडलो त्यावेळी मी प्रेमात आंधळा झालो होतो त्यामुळे बाकीच्या गोष्टी दिसेनाशा झाल्या होत्या. मात्र आता विचारपूर्वक प्रेम करेन. लग्न माझ्यासाठी बाऊन्सर होता असे म्हणत आता चूक झाली. माणसाकडूनच चुका होतात. चुका केल्यावरच आपण शिकतो आणि आता आपण इतरांनाही यातून शिकण्यास सांगू शकतो, असेही तो म्हणाला.

2012 मध्ये धवन आयशा मुखर्जीसोबत लग्नबंधनात अडकला. आयशाचे हे दुसरे लग्न होते. दोघांना 2014 मध्ये एक मुलगा झाला. धवनच्या मुलाचे नाव जोरावर आहे आणि सप्टेंबर 2021 मध्ये दोघं विलग होत असल्याची बातमी आली. सध्या त्यांच्या घटस्फोटाचे प्रकरण सुरू आहे, अशा परिस्थितीत जोरावर त्याच्या आईसोबत मेलबर्नमध्ये राहतो. धवन अनेकदा त्याला भेटायला तिथे जातो.