पत्रकार संघाच्या क्रीडा पुरस्कारांचे आज वितरण

सामना ऑनलाईन । मुंबई

मुंबई मराठी पत्रकार संघाच्या द्वितीय क्रीडा पुरस्कारांचे वितरण सोमवार, 10 जून 2019 रोजी करण्यात येणार आहे. दै. ‘नवाकाळ’चे ज्येष्ठ क्रीडा पत्रकार सुहास जोशी यांना महेश बोभाटे क्रीडा पत्रकारिता पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे. तर ज्येष्ठ क्रीडा पत्रकार दिवंगत आत्माराम मोरे युवा क्रीडा पत्रकार पुरस्काराने ‘महाराष्ट्र टाइम्स’चे क्रीडा पत्रकार विनायक राणे यांना सन्मानित करण्यात येणार आहे. हिंदुस्थानच्या माजी आंतरराष्ट्रीय नेमबाज-प्रशिक्षक अंजली भागवत, सुमा शिरूर, दीपाली देशपांडे यांच्या विशेष उपस्थितीत हे पुरस्कार पत्रकार भवनात 10 जून रोजी सायंकाळी 5.30 वाजता वितरित करण्यात येणार आहेत.

मुंबई मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष नरेंद्र वाबळे यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्याया कार्यक्रमात प्रमुख पाहुणे अंजली भागवत, सुमा शिरूर आणि दीपाली देशपांडे यांच्याशी ‘टोकियो ऑलिम्पिक 2020 आणि नेमबाजी’ या विषयाच्या अनुषंगाने परिसंवादाचे आयोजनही करण्यात आले आहे.

1985 सालापासून क्रीडा पत्रकारिता क्षेत्रात सुहास जोशी यांनी फार मोठे योगदान दिले आहे. ‘सांज तरुण भारत’पासून सुरू झालेली त्यांची क्रीडा कारकीर्द आजही त्याच उत्साहात सुरू आहे. गेल्या 35 वर्षांत त्यांची ‘सांज तरुण भारत’, ‘मुंबई तरुण भारत’ आणि दै. ‘नवाकाळ’ या दैनिकांत क्रीडा पत्रकारिता बहरली. त्यांनी आपल्या लेखांच्या माध्यमातून अनेक खेळाडूंना, संघटकांना न्याय मिळवून दिला. अनेकांना मदत आणि रोजगार मिळवून देण्यात ते यशस्वी झाले. दीड दशकाच्या कारकीर्दीत धडाडीची क्रीडा पत्रकारिता करणाऱ्याविनायक राणे यांनी 2003 साली युवा सकाळमधून आपली क्रीडा पत्रकारिता सुरू केली आणि ती गेली 12 वर्षे ‘महाराष्ट्र टाइम्स’मध्ये कार्यरत आहे. प्रो कबड्डी, चेन्नई ओपन, हॉकी विश्वचषक, युवा फिफा विश्वचषकासह अनेक राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्पर्धांचे वार्तांकन त्यांनी केले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या