हिंदुस्थानने बारा खेळांत गाजवले राष्ट्रकुलचे मैदान, 22 सुवर्णांसह 61 पदके जिंकून चौथ्या स्थानी

इंग्लंडमध्ये पार पडलेल्या यंदाच्या बार्ंमगहॅम राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत हिंदुस्थानी खेळाडूंनी 12 खेळांमध्ये मैदान गाजवत 22 सुवर्ण, 16 रौप्य व 23 कास्य अशी एकूण 61 पदकांची लयलूट केली. 2018च्या राष्ट्रकुल स्पर्धेत हिंदुस्थानने 26 सुवर्णांसह 66 पदके जिंकून पदक तक्त्यात तिसरे स्थान मिळविले होते. हिंदुस्थानने 2010 साली मायदेशात झालेल्या या स्पर्धेत कारकीर्दीतील सर्वोत्तम कामगिरी करताना 101 पदके जिंकून दुसरे स्थान मिळविले होते. मात्र, गत स्पर्धेच्या तुलनेत यंदा पदकांची संख्या कमी होऊन आणि पदक तक्त्यातील क्रमवारीत घसरण होऊनही हिंदुस्थानची कामगिरी सरस ठरली आहे. कारण नेमबाजी, तिरंदाजी, ग्रीको रोमन कुस्ती आणि टेनिस या हुकमी पदक जिंकून देणाऱया चार खेळांचा समावेश नसतानाही हिंदुस्थानने या स्पर्धेत समाधानकारक कामगिरी केली आहे.

कुस्तीमध्ये हिंदुस्थानची सत्ता

नेमबाजी खेळाच्या गैरहजेरीत हिंदुस्थानला कुस्ती या खेळाने तारले. 12 मल्लांच्या पथकातील प्रत्येकाने देशासाठी पदक जिंकले. कुस्तीत हिंदुस्थानला 6 सुवर्ण, 1 रौप्य व 5 कास्य पदके मिळाली. मागील स्पर्धेत या खेळात हिंदुस्थानी मल्लांनी 5 सुवर्ण, 3 रौप्य व 4 कास्य पदकांची कमाई केली होती.

वेटलिफ्टिंग, बॉक्सिंग, टेटे, अॅथलेटिक्समध्ये दमदार कामगिरी

कुस्तीनंतर हिंदुस्थानी खेळाडूंनी वेटलिफ्टिंगमध्ये सर्वाधिक 10 पदकांची कमाई केली. बॉक्सिंग आणि टेबल टेनिस या दोन क्रीडा प्रकारांत हिंदुस्थानने 7-7 पदके मिळविली. बॅडमिंटनपटूंनीदेखील हिंदुस्थानच्या झोळीत 6 पदके टाकली. अॅथलेटिक्समध्येही हिंदुस्थानी खेळाडूंनी 8 पदके जिंकण्याचा पराक्रम केला. याचबरोबर राष्ट्रकुल स्पर्धेच्या इतिहासात यंदा प्रथमच हिंदुस्थानला लॉन बॉलमध्ये एक सुवर्ण व एक रौप्य पदक मिळाले. शिवाय, पॅरालिफ्टिंगमध्ये एक, ज्युडोमध्ये तीन, हॉकीत दोन, क्रिकेटमध्ये एक आणि स्क्वॉशमध्ये दोन पदके मिळाल्याने हिंदुस्थानने आपल्या हुकमी खेळांचा समावेश नसतानाही बार्ंमगहॅम राष्ट्रकुल स्पर्धेत पदकांची लयलूट केली.

चार खेळांचा समावेश नसल्याने…

मायदेशात 2010मध्ये झालेल्या दिल्ली राष्ट्रकुल स्पर्धेत हिंदुस्थानने नेमबाजीमध्ये 30, तिरंदाजीत 8, ग्रीको-रोमन कुस्तीत 7 आणि टेनिसमध्ये 4 पदके जिंकली होती. या चार खेळांतच 49 पदके जिंकल्यामुळे हिंदुस्थानला त्यावेळी पदकांची शंभरी पार करता आली होती. हिंदुस्थानला हमखास पदक मिळवून देणाऱया या चारही खेळांचा यंदाच्या राष्ट्रकुल स्पर्धेत समावेश नव्हता. त्यामुळे हिंदुस्थानने जिंकलेली ही 61 पदकांची कामगिरी आजपर्यंतच सर्वोत्तम कामगिरी म्हणायला हरकत नाही.

स्टार खेळाडूंची निराशा

यंदाच्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत हिंदुस्थानी खेळाडूंनी उंच उडी, लांब उडीसारख्या खेळातही अनपेक्षितपणे पदके जिंकण्याचा पराक्रम केला. मात्र, ‘भरवशाच्या म्हशीला टोणगा’ या म्हणीप्रमाणे लवलीना (बॉक्सिंग), मनिका बत्रा (टेटे), पूनम यादव (वेटलिफ्टिंग), हिमा दास (अॅथलेटिक्स), सीमा पूनिया (थाळीफेक) या स्टार खेळाडूंनी यंदाच्या राष्ट्रकुल स्पर्धेत निराशा केली. लवलीना ही बार्ंमगहॅमहून रिकाम्या हाताने परतलेली एकमेव हिंदुस्थानी बॉक्सर ठरली. उपांत्यपूर्व फेरीत तिने ऑलिम्पिक पदक विजेत्या वेल्सच्या बॉक्सरला हरविले होते. मात्र, त्यानंतर तिने निराशा केली. अनुभवी टेबल टेनिसपटू मनिका बत्राने 2018च्या राष्ट्रकुल स्पर्धेत 2 सुवर्णासह 4 पदके जिंकली होती. मात्र, यावेळी हिंदुस्थानची ही आघाडीची खेळाडू महिला एकेरी, महिला दुहेरी, सांघिक आणि मिश्र दुहेरीमध्ये उपांत्यपूर्व फेरीतच गारद झाली. वेटलिफ्टिंगमध्ये गत स्पर्धेत सुवर्ण पदक जिंकलेल्या पूनम यादवनेही यावेळी निराशा केली. स्नॅचमध्ये 98 किलो वजन उचलणाऱया पूनमने क्लीन अॅण्ड जर्कमध्ये तिन्ही प्रयत्नांत फाऊल केल्याने तिला अपात्र ठरविण्यात आले. 20 वर्षांखालील जागतिक स्पर्धेत सुवर्ण पदक जिंकलेल्या हिमा दासकडून राष्ट्रकुल स्पर्धेतही देशवासीयांना मोठी आशा होती. 2018च्या राष्ट्रकुल स्पर्धेतही तिने तीन पदके जिंकली होती. मात्र, यंदाच्या स्पर्धेत हिमाला 200 मीटर शर्यतीची फायनलही गाठता आली नाही. थाळीफेकमध्ये सीमा पूनियानेही घोर निराशा केली. 2006पासून राष्ट्रकुल स्पर्धेत पदकांची कमाई करणारी ही खेळाडूदेखील यंदा रिकाम्या हाताने माघारी परतली. 55.92 मीटर ही तिची यावेळची सर्वोत्तम कामगिरी ठरली व ती पाचव्या स्थानी राहिली.

हिंदुस्थानला या खेळांत मिळाली पदके

खेळ         सुवर्ण   रौप्य  कास्य  एकूण
कुस्ती         6       1      5   12
टेबल टेनिस  4       1      3    07
वेटलिफ्टिंग   3       3      4    10
बॉक्सिंग      3       1      3     07
अॅथलेटिक्स 1       4      3    08
लॉन बॉल     1      1      0    02
पॅरा पॉवरलिफ्ट 1    0     0     01
ज्युडो            0   2     1     03
हॉकी           0    1     1     02
क्रिकेट         0    1     0     01
बॅडमिंटन       3    1     2    06
एकूण         22  16    23 61

कोणाला मिळाली किती पदके

लिंग      सुवर्ण रौप्य कास्य एकूण
पुरुष      13   09   13  35
महिला    08   06   09  23
मिश्र      01   01    01  03
एकूण    22   16    23  61