हिंदुस्थानच्या शरथ कमलचा राष्ट्रकुल स्पर्धेत ‘वन मॅन शो’

यंदाच्या बर्मिंगहॅम राष्ट्रकुल स्पर्धेत हिंदुस्थानचा स्टार टेबल टेनिसपटू अचिंता शरथ कमल याने स्पर्धेत तब्बल तीन सुवर्णपदके मिळवून आगळा विक्रम केला आहे. या स्पर्धेत सहभागी 56 देशांना जेवढी पदके जिंकता आली नाहीत तेवढी कमलने एकटय़ानेच जिंकण्याचा भीमपराक्रम केला आहे. कमलने प्रथम पुरुष दुहेरीत देशाला सुवर्णपदक मिळवून दिले. त्यानंतर त्याने मिश्र दुहेरीतही शानदार खेळ करीत दुसरे सुवर्णपदक पटकावले. आपल्या कामगिरीवर कळस चढवत त्याने अखेर पुरुष एकेरीत अजिंक्यपद पटकावत स्पर्धेतील आपली सुवर्णपदकांची हॅटट्रिक पूर्ण केली. त्याच्या या ‘वन मॅन शो’ची सर्वत्र स्तुती होत आहे. यापूर्वी हिंदुस्थानच्या जसपाल राणा आणि समरेश जंग यांनीही अशीच चमकदार कामगिरी केली होती, पण हे दोघेही नेमबाज होते. अचंता हा तीन सुवर्णपदक जिंकणारा पहिला टेबल टेनिसपटू ठरला आहे.