बर्मिंगहॅमनंतर लंडनमध्येही फडकला तिरंगा, भवानी देवीने राष्ट्रकुल तलवारबाजी स्पर्धेत सुवर्णपदक राखले

हिंदुस्थानी खेळाडूंनी बर्मिंगहॅममध्ये राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेचे मैदान गाजविल्यानंतर बुधवारी सकाळी लंडनमधील राष्ट्रकुल तरवारबाजी स्पर्धेतही ‘‘जन गण मन’ची धून ऐकायला मिळाली. हिंदुस्थानची तलवारबाज भवानी देवी वैयक्तिक सेव्हर प्रकारात सुवर्णपदक राखण्यात यशस्वी ठरली अन् लंडनमध्येही तिरंगा सर्वात उंच फडकला. 2019 मध्येही भवानी देवी या स्पर्धेत चॅम्पियन ठरली होती.

28 वर्षीय भवानी देवीने अंतिम लढतीत ऑस्ट्रेलियाच्या वरोनिका वासिलेवा हिचा 15-10 गुणफरकाने पराभव करीत सुवर्णपदकावर आपले नाव कोरले. हिंदुस्थानच्या या ऑलिम्पियन खेळाडूला यंदाच्या स्पर्धेत सलामीच्या लढतीत बाय मिळाला होता. त्यानंतर अमेरिकेच्या अलेक्झेंडर डेव्हिडचा 15-6 फरकाने धुव्वा उडवून भवानी देवीने उपांत्य फेरीत धडक दिली होती. मग स्कॉटलंडच्या लुसी हाइघम हिची 15-5 गुणफरकाने दाणादाण उडवून हिंदुस्थानी खेळाडूने अंतिम फेरी गाठली होती. सुवर्णपदकाच्या लढतीत ऑस्ट्रेलियाच्या वरोनिका वासिलेवावर अचूक हल्ले चढवत भवानीदेवीने आपले अजिंक्यपद राखण्याचा पराक्रम केला.

बांबूच्या काठीने शिकली तलवारबाजी

भवानीचे वडील मंदिरात पुजारी आहेत. ते मंदिरात आणि लोकांच्या घरी जाऊन पूजा करतात. आई गृहिणी आहे. पाच भावंडांमध्ये भवानी देवी सर्वात लहान होय. घराची परिस्थिती तशी बेताचीच होती. अशा परिस्थितीत भवानी देशी बांबूच्या काठीने तलवारबाजी खेळ शिकून थेट ऑलिम्पिकपर्यंत धडकली. रिओ ऑलिम्पिकच्या तयारीसाठी भवानी देवीच्या वडिलांना लोकांकडून पैसे उसने घेतले होते. एवढेच नव्हे तर तिच्या आईलाही लेकीसाठी आपले दागिनेही गहाण ठेवावे लागले होते, मात्र आज भवानी देवीची तलवार सातासमुद्रापार तळपत आहे.

ऑलिम्पिक खेळणारी देशाची पहिली तलवारबाज

ऑलिम्पिकमध्ये खेळणारी भवानी देशी ही हिंदुस्थानची पहिली तलवारबाज ठरली होती. रियो ऑलिम्पिकमध्ये तलवारबाजीतील पहिला सामना जिंवैन भवानी देवी स्टार बनली होती. दुसऱया सामन्यात तिला पराभव पत्करावा लागला तरी तिची ही कामगिरी ऐतिहासिक ठरली होती. कारण ऑलिम्पिकमध्ये सामना जिंकणारी ती पहिली हिंदुस्थानसाठी तलवारबाज ठरली होती.