बुद्धिबळ ऑलिम्पियाड – हिंदुस्थानच्या महिला, पुरूष संघांना ऐतिहासिक कास्यपदक

ईच्या ममालापुरंममध्ये खेळवण्यात आलेल्या 44 व्या बुद्धिबळ ऑलिम्पियाडमध्ये यजमान हिंदुस्थानने सांघिक गटात महिला गट आणि पुरुष गटात ऐतिहासिक कास्यपदके पटकावली. त्याचसोबत वैयक्तिक स्पर्धांत हिंदुस्थानी बुद्धिबळपटूंनी शानदार खेळ करीत 2 सुवर्णपदके, 1 रौप्यपदक आणि 4 कास्यपदके अशा 7 पदकांची लयलूट केली. हिंदुस्थानी बुद्धिबळपटूंच्या या कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे.

महिला गटात हिंदुस्थान ‘अ’ संघाला अंतिम लढतीत अमेरिकेकडून 1-3 असा मोठा पराभव पत्करावा लागला. कोनेरू हंपी आणि आर. वैशाली यांनी आपल्या लढती बरोबरीत सोडवल्या. तर तानिया सचदेव आणि भक्ती कुलकर्णी यांना त्यांच्या लढतींत पराभव पत्करावा लागला. त्यामुळे अमेरिकेने 3-1 अशी बाजी मारली. या पराभवामुळे हिंदुस्थानी महिला संघाला कास्यपदकावर समाधान मानावे लागले. महिला गटात युव्रेनने सुवर्णपदक पटकावले. खुल्या गटात उझबेकिस्तानने आर्मेनियाला बरोबरीत रोखून सुवर्णपदक पटकावले. आर्मेनियाला रौप्यपदकावरच समाधान मानावे लागले. खुल्या गटात पुरुषांच्या हिंदुस्थान ‘ब’ संघाने जर्मनीचा 3-1 असा पराभव करीत कास्यपदकावर नाव कोरले. हिंदुस्थानच्या डी. गुकेशने 11 पैकी 9, निहाल सरीनने 10 पैकी 7.5, आर. प्रज्ञानंदने 9 पैकी 6.5 तर रौनक साधवानीने 8 पैकी 5.5 गुण मिळवत संघाला तिसरा क्रमांक मिळवून दिला.

वैयक्तिक गटात हिंदुस्थानला 2 सुवर्णपदकांसह 7 पदके

ऑलिम्पियाडच्या वैयक्तिक गटात हिंदुस्थानच्या बुद्धिबळपटूंनी शानदार खेळ करीत 2 सुवर्ण, 1 रौप्य आणि 4 कास्यपदके अशी एकूण 7 पदके पटकावली. वैयक्तिक गटात गुकेशने टॉपच्या पटावर तर सरीनने दुसऱया पटावर सुवर्णपदक पटकावले. अर्जुन एरिगाईसीने तिसऱया बोर्डावर रौप्यपदक मिळवले. त्यानंतर आर. प्रज्ञानंद (तिसरा बोर्ड), आर. वैशाली (तिसरा बोर्ड), तानिया सचदेव (तिसरा बोर्ड) आणि दिव्या देशमुख (राखीव बोर्ड) यांनी हिंदुस्थानला 4 रौप्यपदके मिळवून दिली.