वर्चस्व जपानचे विजय कोस्टारिकाचा! फिफा वर्ल्ड कपमध्ये आणखी एक धक्कादायक निकाल

फिफा वर्ल्ड कपमध्ये रविवारी आणखी एक धक्कादायक निकाल बघायला मिळाला. स्पेनकडून 0-7 गोल फरकाने पराभवाची नामुष्की पत्करलेल्या कोस्टा रिकाने जर्मनीला पराभवाचा धक्का देणाऱया जपानला 1-0 गोल फरकाने हरवले. खरंतर या लढतीवर जपानच्या खेळाडूंनी वर्चस्व गाजवले. मात्र कोस्टा रिकाच्या किशर फुलरने 81व्या मिनिटाला केलेला गोल गोल्डन गोल ठरला. फुटबॉल वर्ल्ड कपमधील हा तिसरा धक्कादायक निकाल होय.

लढतीवर जपानचे वर्चस्व, पण…

या लढतीत जपानने कोस्टा रिकावर वर्चस्व गाजवले. जपानच्या आक्रमण फळीने कोस्टा रिकाच्या गोलपोस्टवर 13 वेळा धडका दिल्या. कोस्टा रिकाकडून केवळ चार वेळा जपानच्या गोलपोस्टवर हल्ले झाले. मात्र यातील एकाचे गोलमध्ये रुपांतर झाल्याने कोस्टा रिकाने हा सामना जिंकला. लढतीत 57 टक्के चेंडू हा जपानच्या ताब्यात होता, तर कोस्टा रिकाचा 43 टक्के चेंडू वर राहिला. जपानला पाच कॉर्नर मिळाले; पण कोस्टा रिकाला एकदाही कॉर्नर घेण्याची संधी मिळाला नाही. या लढतीत जपानकडून तब्बल 22 फाऊल झाले, तर कोस्टा रिकाने केवळ 9 फाऊल केले. उभय संघांना 3-3 एलो कार्ड मिळाले. मात्र आज नशीबच कोस्टा रिकाच्या बाजूने होते, असेच म्हणावे लागेल.

आजच्या लढती

पॅमेरून विरुद्धे सर्बिया (जी) (दुपारी 3.30 वा.)
द. कोरिया विरुद्ध घाना (एच) (सायं. 6.30 वा.)
ब्राझील विरुद्ध स्वित्झर्लंड (जी) (रात्री 9.30 वा.)
पोर्तुगाल विरुद्ध उरुग्वे (एच) (मध्यरात्री 12.30 वा.)

जपानला चूक भोवली

जपान-कोस्टा रिका यांच्यात 80व्या मिनिटापर्यंत हल्ले-प्रतिहल्ले सुरू होते. मात्र जपानच्या एका मिडफिल्डरने चुकून कोस्टा रिकाच्या तेजेदाला पास दिला. तेजेदाने मोठय़ा चपळाईने पुढे येत पास किशर फुलरकडे सोपविला. फुलरने जबरदस्त चिप लगावत चेंडू गोलरक्षकाच्या डोक्यावरून गोलपोस्टमध्ये पाठविला. या एकमेव गोलच्या बळावर कोस्टा रिकाने जपानसारख्या बलाढय़ आशियाई संघावर विजय मिळविला.