
बर्मिंगहॅम राष्ट्रकुल स्पर्धेत हिंदुस्थानला भालाफेकीचे कास्यपदक पटकावून देणाऱया अनू राणीचा संघर्ष फार मोठा आहे. आर्थिक स्थितीमुळे तिचे वडील तिला मदत करू शकत नव्हते. यावर पर्याय म्हणून तिने ‘देसी जुगाड’ वापरला. तिने भालाफेच्या सरावासाठी खऱया भाल्याऐवजी उसाचा वापर केला. आपल्या बहिणीची क्षमता ओळखून भाऊ उपेंद्र कुमारने तिला घरापासून 20 किलोमीटर अंतरावर असलेल्या ‘गुरुकुल प्रभात आश्रमा’मध्ये नेले. तिथे ती आठवडय़ातील तीन दिवस भालाफेकीचा सराव करू शकत होती. याशिवाय उपेंद्रने तिच्यासाठी स्वतःचा खेळही सोडून दिला. त्याने वर्गणी गोळा करून तिच्यासाठी बूटही खरेदी केले होते. अनेक संकटांवर मात करून अनू राणीने राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत देशासाठी ऐतिहासिक कामगिरी केली आहे. तिच्या पूर्वी राष्ट्रकुल स्पर्धेत काशीनाथ नायक (2010) आणि नीरज चोप्रा (2018) यांनीच भालाफेकीमध्ये पदक मिळवलेले होते.