गोलपोस्टच्या पलीकडचे, फिफा विश्वचषक जेतेपदाची ट्रॉफी ‘मेड इन इंडिया’

फुटबॉल विश्वचषकासाठी हिंदुस्थानी फुटबॉल संघ पात्र ठरला नसला तरी हिंदुस्थानींसाठी एक अभिमानास्पद माहिती समोर आली आहे. यंदाच्या कतार फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेत विजेत्या आणि उपविजेत्या संघांना दिली जाणारी बहुमूल्य सुवर्ण मुलामा देण्यात आलेली ट्रॉफी हिंदुस्थानच्या आग्रा शहरातील कारागीर अदनान शेख यांनी तयार केली आहे. ट्रॉफी आणि बॉक्सचे वजन सुमारे 22 किलो आहे. त्यातील बॉक्स 15 किलोचा आहे. उर्वरित ट्रॉफी 7 किलो वजनाची आहे. बॉक्स आणि ट्रॉफी बनवण्यासाठी नैसर्गिक अर्ध-मौल्यवान दगड लॅपीस लाझुली वापरण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. दगडावर पितळ ठेवले आहे. त्यानंतर त्यावर 22 कॅरेट सोन्याचा मुलामा चढवण्यात आला आहे. ही ट्रॉफी आणि बॉक्स अनमोल आहे. हा दगड आफ्रिकेत आढळतो. ते बनवताना हस्तकलेचा वापर करण्यात आला आहे. अदनानच्या ADziran या कंपनीने ट्रॉफी तयार केली आहे.