मोरोक्कोचा बेल्जियमला पराभवाचा धक्का

फिफा वर्ल्डकपमध्ये रविवारचा दिवस सलग दुसऱया खळबळजनक निकालाने गाजला. जागतिक क्रमवारीत दुसऱया स्थानी असलेल्या बेल्जियमला 22व्या मानांकित मोरोक्कोने 2-0 गोल फरकाने पराभवाचा धक्का दिला. यंदाच्या वर्ल्डकपमधील मोरोक्कोचा हा पहिलाच विजय होय. ग्रुप ‘एफ’मध्ये सलामीच्या लढतीत मोरोक्कोने क्रोएशियाला गोलशून्य बरोबरीत रोखले होते, तर बेल्जियमने पॅनडाला हरविले होते.

फ्री किकवरील पहिला गोल

मोरोक्कोने बलाढय बेल्जियमचे अनेक हल्ले परवातून लावले.    बेल्जियमचे वर्चस्व असलेल्या या लढतीत मोरोक्कोच्या अब्देलहमीद साबिरीने 73व्या मिनिटाला गोल करीत मोरोक्कोचे खाते उघडले. त्याने फ्री किकवर हा थेट गोल केला. यंदाच्या स्पर्धेत फ्री किकवरील हा पहिलाच गोल ठरला, हे विशेष. त्यानंतर जकारिया अबूखलालने सामन्याच्या अतिरिक्त वेळेत (90औ2) गोल करीत मोरोक्कोला 2-0 असा विजय मिळवून दिला. बेल्जियमने 67 टक्के चेंडूवर ताबा ठेवत सामन्यात वर्चस्व गाजविले. त्यांना 9 कॉर्नर मिळाले. मोरोक्कोला केवळ एकदाच कॉर्नर मिळाला होता.