हिंदुस्थानच्या प्रियंकाची वुशूत आंतरराष्ट्रीय पदकाला गवसणी

हिंदुस्थानच्या प्रियंका केवटने सुवर्णपदकाला गवसणी घालत नवा इतिहास रचला आहे. आंतरराष्ट्रीय वुशू स्पर्धेच्या 18 वर्षांखालील वयोगटातील 48 किलो वजनी गटात सुवर्णपदक जिंकले. या स्पर्धेत पदक जिंकणारी ती पहिलीच हिंदुस्थानी खेळाडू ठरली आहे. ही स्पर्धा जॉर्जिया येथील बटुमी येथे सुरू आहे. हिंदुस्थानींसाठी अपरिचित असणाऱया या खेळातील प्रियंकाच्या यशामुळे तिचे विशेष कौतुक होत आहे.

प्रियंका ही मध्य प्रदेशातील मधिला गावातील आर्थिकदृष्टय़ा दुर्बल कुटुंबातील आहे. तिचे वडील स्थानिक नर्सिंग होममध्ये काम करतात. पण खडतर परिस्थितीवर मात करत तिने हे घवघवीत यश मिळवले आहे. कारण वुशूसारख्या खेळात करीअर करणे सोपे नसते. कारण खेळाचा जास्त प्रचार आणि प्रसार हिंदुस्थानात झालेला नाही. त्याचबरोबर या खेळासाठी प्रशिक्षण सहज उपलब्ध होत नाही. हिंदुस्थानात क्रिकेट, फुटबॉलसारख्या खेळाडूंचे प्रशिक्षण सहज मिळू शकते. पण वुशू या खेळासाठी प्रशिक्षण हे फारसे लवकर उपलब्ध होत नाही.

काय आहे वुशू खेळ

वुशू हा एक चिनी मार्शल आर्ट्सचा प्रकार आहे. हा खेळ आशियाई क्रीडा स्पर्धा, आग्नेय आशियाई खेळ आणि इतर अनेक प्रमुख क्रीडा स्पर्धांचा भाग आहे. प्रियंकाने आता वयोगटातील स्पर्धांमध्ये सुवर्णपदक पटकावले आहे. पण आता तिची खरी परीक्षा सुरू होणार आहे. कारण आता यापुढे तिला खुल्या गटात खेळावे लागणार आहे.