
गतविजेत्या हिंदुस्थानी संघाने महिला आशिया चषक टी-20 क्रिकेट स्पर्धेत सलग दुसरा विजय मिळवित उपांत्य फेरीच्या दिशेने दमदार आगेकूच केली आहे. हिंदुस्थानी महिलांनी नवख्या यूएई संघाला 78 धावांनी धूळ चारली. रिचा घोष आणि कर्णधार हरमनप्रीत कौर यांची दणकेबाज अर्धशतके ही हिंदुस्थानच्या विजयाची वैशिष्टय़े ठरली. नाबाद 64 धावांची खेळी करणारी रिचा घोष या विजयाची शिल्पकार ठरली.
हिंदुस्थानकडून मिळालेल्या 202 धावांच्या आव्हानात्मक लक्ष्याचा पाठलाग करताना यूएई संघाला 7 बाद 123 धावसंख्येपर्यंतच मजल मारता आली. त्यांच्याकडून कर्णधार इशा ओझा (38) व मधल्या फळीतील कविशा इगोदगे (नाबाद 40) यांनीच काय तो हिंदुस्थानी गोलंदाजीचा प्रतिकार केला. त्यानंतर खुशी शर्मा (10) ही दुहेरी धावा करणारी तिसरी फलंदाज ठरली. सलामीवीर इशा ओझा वगळता आघाडीच्या फळीतील इतर फलंदाजांनी निराशा केल्याने यूएईला मोठय़ा पराभवाचा सामना करावा लागला. हिंदुस्थानकडून दीप्ती शर्माने 2, तर रेणुका सिंग, पदार्पणवीर तनुजा कन्वार, पूजा वस्त्राकर व राधा यादव यांनी प्रत्येकी एक बळी टिपला. आता तिसऱया लढतीत हिंदुस्थानी महिलांची गाठ नेपाळशी पडणार आहे.
नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी करताना हिंदुस्थानने पावर प्लेमध्येच तीन फलंदाज गमावल्या. सलामीवीर स्मृती मानधना 13 धावांवर बाद झाली. दुसरी सलामीवीर शफाली वर्माने 18 चेंडूंत 5 चौकार व एका षटकारासह 37 धावांची खेळी केली. मात्र, ती पाचव्या षटकात बाद झाली. त्यानंतर पुढच्याच षटकात दयालन हेमलता (2) बाद झाल्याने हिंदुस्थानची 5.1 षटकांत 3 बाद 52 अशी अवस्था झाली.
रिचा-हरमनची फटकेबाजी
धावफलकावर अर्धशतक लावून तीन फलंदाज माघारी परतल्यानंतर कर्णधार हरमनप्रीत कौर हिने फलंदाजीची सूत्रे हाती घेतली. त्यातच जेमिमा रॉड्रिग्ज 14 धावांवर बाद झाली. मग आलेल्या रिचा घोषने (नाबाद 64) हरमनच्या (66) साथीत पाचव्या विकेटसाठी 45 चेंडूंत 75 धावांची भागीदारी करीत हिंदुस्थानला आव्हानात्मक धावसंख्या उभारून दिली. हरमनने 47 चेंडूंत 7 चौकार व एका षटकारासह 66 धावा फटकाविल्या, रिचाने 29 चेंडूंत 12 चौकार व एका षटकारासह आपली नाबाद खेळी सजविली. तिने अखेरच्या षटकात सलग पाच चौकार ठोकून हिंदुस्थानला दोनशे धावांचा टप्पा ओलांडून दिला. यूएईकडून कविशा इगोदगेने 2, तर समायरा धर्णीधर्का व हिना होतचंदानी यांनी 1-1 बळी टिपला.