पाच वर्षे आधीच पदक मिळायला हवे होते! राहुल आवारेचे उद्गार

569

‘दहा वर्षांच्या आंतरराष्ट्रीय कुस्तीच्या प्रवासात अनेक चढउतार अनुभवले. यशाने कधी मातलो नाही. अपयशाने खचलो नाही. आद्यगुरू स्व. हरिश्चंद्र बिराजदार मामांनी पाहिलेल्या ऑलिम्पिकच्या स्वप्नपूर्तीसाठी वस्ताद काका पवार यांच्या मार्गदर्शनाखाली मार्गक्रमण करतोय. या दोन गुरुवर्यांमुळेच मी कुस्तीत नाव कमावले, मात्र प्रामाणिकपणे सांगायचे झाल्यास, स्वतःला ओळखायला मलाच थोडा उशीर झाला. नाहीतर हे जागतिक कुस्ती स्पर्धेतील पदक पाच वर्षे आधीच माझ्या गळ्यात दिसले असते. कदाचित पदकाचा रंगही वेगळा असता,’ अशी खंत मराठमोळा आंतरराष्ट्रीय मल्ल राहुल आवारे याने व्यक्त केली.

जागतिक कुस्ती स्पर्धेत कास्यपदक जिंकणारा पहिला मराठमोळा मल्ल ठरलेल्या राहुल आवारेचे मंगळवारी कर्मभूमी पुण्यात जंगी स्वागत झाले. त्यानंतर पुणे श्रमिक पत्रकार संघाच्या वतीने बुधवारी त्याचा वार्तालाप आयोजित करण्यात आला होता.

ऑलिम्पिकची आशा सोडलेली नाही

राहुल आवारे म्हणाला, ‘जागतिक कुस्ती स्पर्धेत ऑलिम्पिक गट नसलेल्या 61 किलो गटात खेळलो असलो, तरी अद्यापि मी ऑलिम्पिक खेळण्याची आशा सोडलेली नाही. टोकियो ऑलिम्पिकपर्यंत मी 57 किलो गटाच्या दृष्टीनेच स्वतःला सज्ज ठेवणार आहे, असा निर्धारही राहुलने बोलून दाखविला.

कोल्हापूर कुस्तीचे केंद्र व्हायला हवे होते!

‘कोल्हापूरला कुस्तीची पंढरी म्हटले जाते. मात्र, अलीकडच्या काळात कोल्हापूरचे मल्ल सरावासाठी पुण्यात येतात, याहून दुर्दैव ते काय! खरं तर कोल्हापूरमधील कुस्तीचा वारसा बघता, तेथे आतापर्यंत महाराष्ट्राच्या कुस्तीचे केंद्र व्हायला हवे होते, असे राहुल आवारेला वाटते.

आपली प्रतिक्रिया द्या