रत्नागिरीचे ‘क्रिडा रत्न’ अभिषेक चव्हाण

53

<< सामना स्टार >>  नवनाथ दांडेकर 

रत्नागिरीसारख्या  छोट्या शहरात त्याचे सारे बालपण गेले. वडील एसटीत असल्यामुळे रत्नागिरीतील एसटी महामंडळाच्या चाळीत खेळून, बागडून मोठा झालेला आणि घरच्या गरिबीत, अनंत अडचणींना तोंड देत त्याने यंदा राज्य कॅरम विजेतेपदाला गवसणी घातलीय. वडील एसटी सेवेतून चालक पदावरून सेवानिवृत्त झालेले, आईला नुकताच अर्धांगवायूचा झटका आलेला, कंपनी बंद झाल्याने हातची चांगली नोकरी गेलेली… अशा संकटाच्या जंजाळातही अभिषेकने आपला कॅरमचा खेळ मोठय़ा कष्टाने जपला. मोठ्या निर्धाराने मुंबईतील राज्य अजिंक्यपद मानांकन कॅरम स्पर्धेत सहभाग घेत कोकणच्या या ‘झिला’ने आयुष्यातील पहिलेच राज्य कॅरम विजेतेपद पटकावण्याचा भीमपराक्रम यंदा केलाय. त्याच्या या पराक्रमाला जिद्द आणि अफलातून एकाग्रतेची सोनेरी किनार आहे. त्यामुळेच कारकीर्दीतील पहिल्या जेतेपदाचा मुकुट पटकावताना अभिषेकने उपांत्य फेरीत विद्यमान जगज्जेता कॅरमपटू प्रशांत मोरेला नमवले, तर अंतिम फेरीत माजी विश्वविजेता योगेश परदेशीला पराभूत करीत प्रतिष्ठेचे राज्य कॅरम अजिंक्यपद पटकावलेय.

रत्नागिरीच्या रा. भा. शिर्के प्रशाला स्कूलमध्ये अभिषेकचे शालेय शिक्षण झाले. बालपणापासूनच एसटी चाळीत कॅरमचे सामने पाहायचे, मध्येच बाद झालेल्या सोंगट्या गोळा करून देण्याचे काम करणारा अभिषेक आज त्याच कॅरमचा ‘राजा’ बनलाय. कॅरममध्ये पारंगत असलेल्या आपल्या वडिलांना गेममध्ये पराभूत केल्याशिवाय कॅरमच्या बैठकीतून हलायचे नाही हा शिरस्ता पाळणाऱ्या अभिषेकला शेजाऱ्यांनी रत्नागिरीच्या बाळू शेट भिंगार्डे यांच्या कॅरम क्लबमध्ये नेले. या क्लबने अभिषेकच्या क्रीडा कारकीर्दीला विलक्षण कलाटणी मिळाली. या क्लबमध्ये खेळणारे मुंबईचे राष्ट्रीय कॅरमपटू रियाझ अकबर अली, अनिल गांधी यांनी त्याच्यातील गुण हेरून त्याला उत्स्फूर्त मार्गदर्शन केले. या पाठिंब्याच्या बळावर अभिषेकने रत्नागिरीतील सबज्युनियर राज्य कॅरम स्पर्धा जिंकून राज्यभरातील कॅरमशौकीनांचे लक्ष स्वतःकडे वेधून घेतले. अभिषेकचे गुरू रियाझ अकबर अली यांनी त्याला फक्त कॅरमचेच नव्हे, तर या गतिमान जगात कसे जगायचे, कसे वागायचे याचेही आदर्श धडे दिले. यातूनच कोकणच्या लाल मातीतून एका नवा राज्य कॅरम विजेता घडलाय. प्रतिकूल परिस्थितीशी संघर्ष करून यशाची एक मोठी पायरी गाठणाऱ्या अभिषेकला आता राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय कॅरम जेतेपदापर्यंत मजल मारायची आहे. मात्र त्यासाठी एखादी उत्तम नोकरी मिळावी यासाठी तो परिश्रम घेतोय. रत्नागिरीकरांनी आपल्यावर पुत्रवत प्रेम करून मुंबईच्या प्रवासासाठी पैशांचीही मदत केली हे सांगताना अभिषेक आजही हेलावून जातो. गुरूंच्या, आई-वडिलांच्या आणि क्रीडाशौकीनांच्या ऋणातून उतराई होण्यासाठी कॅरमचे राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय अजिंक्यपद पटकावण्यासाठी अभिषेक अथक परिश्रम घेतोय. त्यात त्याला उदंड यश लाभो यासाठी आपण शुभेच्छा येऊया!

मंडपेश्वर स्पर्धेत अभिषेकचा अपूर्व भीमपराक्रम

यंदाच्या मंडपेश्वर सिव्हिक फेडरेशन, बोरीवली आयोजित राज्य मानांकन कॅरम स्पर्धेत रत्नागिरीकर अभिषेक चव्हाणने अफलातून पराक्रमाची नोंद केलीय. त्याने उपांत्य फेरीत विश्वविजेत्या प्रशांत मोरेला पराभूत करीत सनसनाटी निर्माण केली. त्यानंतर अनुभवी माजी विश्वविजेता योगेश परदेशीला अंतिम फेरीत २५-९, २५-१६ असे नमवून पहिले राज्य मानांकन  जेतेपद पटकावलेय. जिल्हा व स्थानिक स्तरावर चमकदार कामगिरी साकारणारा अभिषेक आता कारकिर्दीत मागे पाहायचे नाही या निर्धाराने तयारी करतोय; मात्र चांगली नोकरी नसल्याने त्याच्या प्रयत्नात अनेकविध समस्या उभ्या ठाकत आहेत. महाराष्ट्राचे क्रीडामंत्री विनोद तावडे व राज्यातील क्रीडाधुरीणांनी नोकरीसाठी आपल्याला सहाय्य करावे असे साकडे अभिषेक चव्हाणने घातले आहे. राज्याच्या या कॅरमपटूला महाराष्ट्र शासनाने रोजगार दिल्यास तो राज्याचे व देशाचे नाव क्रीडाक्षेत्रात निश्चितच उज्वल करील, असा विश्वास अभिषेकचे गुरू रियाझ अकबर अली यांनी व्यक्त केलाय.

आपली प्रतिक्रिया द्या