स्पृहा जोशी दिसणार दाक्षिणात्य चित्रपटात

सामना ऑनलाईन । मुंबई

मराठी कलाकार आपल्या जबरदस्त अभिनयासाठी ओळखले जातात. मराठीतल्या बहुतांश कलाकारांना रंगभूमीची पार्श्वभूमी असल्यामुळे कित्येक वेळा अभिनयात मराठी कलाकार उजवे ठरतात. त्यामुळेच कदाचित इतर भाषिक कलाकृतींसाठीही अनेक निर्माते-दिग्दर्शक मराठी चेहऱ्यांना पसंती देताना दिसतात. आजवर अनेक मराठी कलाकारांना इतर प्रादेशिक भाषांमध्ये अभिनय करण्याची संधी मिळाली आहे. आता या यादीत मराठमोळ्या स्पृहा जोशीचं नावंही जोडलं जाणार आहे.

स्पृहाने नुकतीच सोशल मीडियावर एक फोटोद्वारे ही माहिती दिली आहे. लवकरच आपल्याला दाक्षिणात्य चित्रपटात पाहायला मिळणार आहे, असं स्पृहाने म्हटल आहे. दे धमाल या मालिकेतून बालकलाकार म्हणून पदार्पण करणाऱ्या स्पृहाने अग्निहोत्र, एका लग्नाची दुसरी गोष्ट, उंच माझा झोका, एका लग्नाची तिसरी गोष्ट या मालिकांमधून अभिनय केला आहे. याखेरीज समुद्र, नेव्हर माइंड, डोन्ट वरी ही हॅप्पी या नाटकांमधून आणि पैसा पैसा, मोरया, बायोस्कोप, अ पेईंग घोस्ट अशा चित्रपटांमधूनही तिने अभिनयाची चुणूक दाखवली आहे. आता या दाक्षिणात्य चित्रपटाच्या निमित्ताने दक्षिण हिंदुस्थानी प्रेक्षकांच्या मनातही ती जागा मिळवण्यासाठी सज्ज झाली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या