अल बगदादीची टीप देणाऱया खबऱयाला 177 कोटींचे इनाम

इसिस या दहशतवादी संघटनेचा म्होरक्या अबू बकर अल बगदादी याचा अचूक ठावठिकाणा सांगणाऱयाला अमेरिका तब्बल 2.5 कोटी डॉलर म्हणजेच 177 कोटी रुपयांचे इनाम देणार आहे. इसिसच्या एका खबऱयाने ही कामगिरी पार पाडली होती.

अमेरिकेचे ‘ऑपरेशन बगदादी’ सुरू होते त्यावेळी सीरिया येथील ठिकाणावर संबंधित खबऱया उपस्थित होता अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. या खबऱयाने अमेरिकेला संबंधित ठिकाणाचा नकाशा तसेच अचूक माहिती पुरवली होती. या माहितीच्या आधारावरच अमेरिकेचे लष्कर कारवाई करत होते. अमेरिकन लष्कराच्या जवानांना अचूक माहिती मिळाल्याने त्यांना संबंधित ऑपरेशनची संपूर्ण तयारी करणे सोपे गेले आणि हे ऑपरेशन सफाईदारपणे करण्यात आले, अशी माहिती सीरीयाई डेमोक्रेटीक फोर्सचे जनरल मजलोम आब्दी यांनी दिली.

प्रत्येक खोलीची इत्थंभूत माहिती

संबंधित खबऱयाने बगदादीच्या ठावठिकाण्यातील कोपरानपरा अमेरिकन लष्कराला सांगितला होता. प्रत्येक खोलीची इत्थंभूत माहिती पुरवली होती. बगदादी कुठल्या खोलीत झोपतो इथपासून ते तो कधी कुठे असतो इथपर्यंत तसेच या ठिकाणी आणखी कितीजण आहेत, किती भुयारे आहेत याबाबतची सर्व माहिती अमेरिकेला दिली होती, असे सीरियाई डेमोक्रेटीक फोर्सचे जनरल मजलोम आब्दी यांनी सांगितले. बगदादीवर अमेरिकेने जे इनाम घोषित केले होते ते संपूर्ण इनाम किंवा त्यापैकी काही रक्कम या खबऱयाला मिळण्याची शक्यता आहे.

जोखीम पत्करून अंडरवेअर चोरून आणली
संबंधित खबऱयानेच बगदादीची अंडरवेअर आणि त्याच्या रक्ताचे नमुने चोरून आणले होते. या नमुन्याच्या आधारेच बगदादीच्या मृतदेहाची ओळख पटवण्यात आली. ही मोठी जोखीम होती. यात खबऱयाचा जीवही जाऊ शकत होता. अशा परिस्थितीत त्याने ही कामगिरी केल्याचे आब्दी यांनी सांगितले.

आपली प्रतिक्रिया द्या