नवी मुंबईत दहा महिन्यांत धावणार मेट्रो

22

सामना प्रतिनिधी । नवी मुंबई

गेल्या सहा वर्षांपासून रखडलेल्या नवी मुंबईतील मेट्रोचे काम आता ‘फास्ट ट्रक’वर येणार आहे. सिडकोने मेट्रोच्या 11 स्थानकांचे काम जलद गतीने पूर्ण होण्यासाठी नव्याने चार कंत्राटदारांची नेमणूक केली असून प्रत्यक्ष कामालाही युद्धपातळीवर सुरुवात झाली आहे. त्यामुळे नव्या वर्षातील ऑक्टोबर महिन्यात नवी मुंबईकरांच्या स्वप्नातील मेट्रो धावणार आहे.

पहिल्या टप्प्यात बेलापूर ते पेंधरदरम्यानच्या 11 किमी अंतरावरील उन्नत मार्ग, पेंधर येथील कारशेड उभारण्याचे काम पूर्ण झाले आहे, परंतु कंत्राटदारांच्या वादामुळे स्थानकांचे काम मागील सहा वर्षांपासून रखडले होते. विमानतळ प्रकल्पाच्या कामाने वेग घेतला असून या पार्श्वभूमीवर रखडलेल्या मेट्रोच्या कामालाही गती देण्यात येत आहे. त्यानुसार सॅजोन्स, सुप्रीम आणि महावीर या तीन भागीदार कंपन्यांची हकालपट्टी करून रखडलेले काम पूर्ण करण्यासाठी नवीन कंत्राटदारांची नेमणूक केली आहे.

आंतरराष्ट्रीय विमानतळामुळे मेट्रो प्रकल्पाला विशेष महत्त्व आहे. तीन टप्प्यांतून ही मेट्रो थेट विमानतळाला जोडली जाणार आहे. त्यामुळे भविष्यात वाहतूककोंडीत न अडकता प्रवाशांना हवाई प्रवासासाठी जलदगतीने विमानतळ गाठता येणार आहे.

251 कोटींचा ठेका
मेट्रो प्रकल्पाच्या 11 स्थानकांसाठी प्रकाश कन्सुरियन, बिल्ड राइड, युनिवास्तु, जे. कुमार या कंपन्यांना हे काम देण्यात आले असून त्यासाठी 251 कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहे. यामध्ये प्रत्येक ठेकेदाराला स्थानकांचे काम वाटून देण्यात आल्याने येत्या 10 महिन्यांत मेट्रोचा पहिला टप्पा पूर्ण होईल, असा विश्वास सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांनी व्यक्त केला.

आपली प्रतिक्रिया द्या