चेन्नई सुपरकिंग्जची अंतिम फेरीत धडक

34

सामना क्रीडा प्रतिनिधी । मुंबई 

दक्षिण आफ्रिकन क्रिकेट संघाचा कर्णधार फाफ डय़ुप्लेसिस व मुंबईकर खेळाडू शार्दुल ठाकूर यांनी दबावाखाली जबरदस्त कामगिरी करीत चेन्नई सुपरकिंग्जला सातव्यांदा आयपीएलच्या फायनलमध्ये पोहोचवले. चेन्नई सुपरकिंग्जने मंगळवारी वानखेडे स्टेडियमवर झालेल्या क्वॉलिफायर एक लढतीत सनरायझर्स हैदराबादवर दोन गडी व पाच चेंडू राखून सनसनाटी विजय मिळवला आणि फायनलमध्ये धडक मारली. केन विल्यमसनच्या सनरायझर्स हैदराबादकडे अंतिम फेरीत पोहोचण्यासाठी आणखी एक संधी असणार आहे. राजस्थान रॉयल्स व कोलकाता नाईट रायडर्स यांच्यामधील विजेत्याशी त्यांना दोन हात करावे लागणार आहेत.

सनरायझर्स हैदराबादकडून मिळालेल्या १४० धावांचा पाठलाग करणाऱ्या चेन्नई सुपरकिंग्जची ६ बाद ६२ अशी बिकट अवस्था झाली होती. पण सलामीवीर फाफ डयुप्लेसिसने चार खणखणीत षटकार व पाच चौकारांसह नाबाद ६७ धावांची आणि शार्दुल ठाकूरने पाच चेंडूंत तीन चौकारांसह नाबाद १५ धावांची खेळी करीत दोन वेळा चॅम्पियन ठरलेल्या चेन्नई सुपरकिंग्जला अफलातून विजय मिळवून दिला.

दरम्यान, याआधी चेन्नई सुपरकिंग्जच्या ड्वेन ब्राव्हो ऍण्ड कंपनीच्या प्रभावी गोलंदाजीसमोर सनरायझर्स हैदराबादची ४ बाद ५० अशी अवस्था झाली होती. तसेच त्यांचा निम्मा संघ ६९ धावांमध्येच गारद झाला होता. मात्र याप्रसंगी कार्लोस ब्रेथवेटने अखेरच्या षटकांत हाणामारी करीत सनरायझर्स हैदराबादच्या धावसंख्येत मोलाची भर घातली. त्याने चार षटकार व एक चौकारांसह नाबाद ४३ धावांची खेळी साकारली.

आपली प्रतिक्रिया द्या