श्रीलंकेची अखिलाडीवृत्ती, बाद दिलेल्या खेळाडूला ड्रेसिंगरूममधून इशारा

33

सामना ऑनलाईन । कोलकाता

हिंदुस्थान आणि श्रीलंका संघात कोलकातामध्ये सुरू असलेल्या पहिल्या कसोटीमध्ये श्रीलंकेने अखिलाडीवृत्ती दाखवली आहे. बाद दिलेल्या खेळाडूला ड्रेसिंगरूमधून इशारा करण्यात आल्याने हा वाद सुरू झाला आहे. मात्र यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळताना खेळाडूंच्या खेळ भावनेचा प्रश्न पुन्हा उपस्थित केला जात आहे.

श्रीलंकेच्या पहिल्या डावातील ५७व्या षटकात मोहम्मद शमी गोलंदाजी करत होता, तर श्रीलंकेचा दिलरुवान परेरा समोर फलंदाजीसाठी होता. शमीच्या षटकातील शेवटचा चेंडू परेराच्या पॅडवर जाऊन आदळला. त्यानंतर हिंदुस्थानी संघाने जोरदार अपिल केली. चेंडू यष्ट्यांकडे झेपावत दिसल्याने पंच निजल लॉन्ग यांनी परेराला बाद ठरवले. त्यामुळे परेरा निराश होऊन मैदानाबाहेर जात असतानाच ड्रेसिंगरूमकडून डीआरएस घेण्याचा इशारा करण्यात आला.

ड्रेसिंगरूमकडे जाणारा परेरा अचानक थांबला आणि त्याने डीआरएसचा वापर करण्याचा इशारा करत तिसऱ्या पंचांकडे दाद मागितली. पंचांनी परेराचा हा निर्णय ग्राह्य धरत तिसऱ्या पंचांकडे निर्णय सोपवला. मात्र रिव्ह्यूमध्ये चेंडू यष्ट्यांपासून लांब जाताना दिसला आणि तिसऱ्या पंचांनी परेराला नाबाद ठरवले. मात्र टीव्ही कॅमेरामध्ये श्रीलंकेच्या ड्रेसिंगरूममधून कोणीतरी डीआरएस घेण्याचा इशारा केल्याने दिसल्याने वाद निर्माण झाला आहे. त्यानंतर समालोचन करणाऱ्यांनीही लंका टीमच्या या कृतीवर कडाडून टीका केली. मात्र लंका टीमच्या या कृतीचा मॅच रेफरी डेव्हीड बून आणि आयसीसीकडून कसा समाचार घेतला जातो हे पाहणे महत्त्वाचे असणार आहे.

नियम काय सांगतो?
मैदानावरील पंचांनी खेळाडूला बाद दिल्यास त्याविरोधात तो डीआरएसचा वापर करून तिसऱ्या पंचाकडे दाद मागू शकतो. यासाठी तो मैदानावर उपस्थित असलेल्या आपल्या संघातील दुसऱ्या खेळाडूची मदत घेऊ शकतो. मात्र मैदानाबाहेरून (ड्रेसिंगरूम) कोणी मदत केल्यास हे आयसीसीच्या नियमाविरुद्ध आहे.

याआधी हिंदुस्थान आणि ऑस्ट्रेलिया संघात झालेल्या कसोटी मालिकेमध्ये बंगळूरूत झालेल्या सामन्यात कर्णधार स्थिथला पायचित देण्यात आले होते. त्यावेळीही ऑस्ट्रेलियाच्या ड्रेसिंगरूममधून डीआरएस घेण्याचा इशारा करण्यात आला होता. ऑस्ट्रेलियाच्या या अखिलाडीवृत्तीवर हिंदुस्थानचा कर्णधार विराट कोहलीने प्रश्न उपस्थित केला होता. मात्र आयसीसीकडून त्यावर कोणतीही कारवाई न करण्यात आल्याने अनेक माजी खेळाडूंनी टीका केली होती.

आपली प्रतिक्रिया द्या