हिंदुस्थानकडून श्रीलंकेला इंधन खरेदीसाठी 500 दशलक्ष डॉलर्सचे कर्ज

हिंदुस्थानने श्रीलंकेला इंधन खरेदीसाठी निधी देण्यासाठी 500 दशलक्ष डॉलर्स कर्ज (क्रेडिट लाइन) मंजूर केले. सध्या श्रीलंका दशकातील सर्वांत वाईट आर्थिक आणि ऊर्जा संकटावर मात करण्यासाठी संघर्ष करीत आहे. श्रीलंकेला इंधन आयातीसाठी हिंदुस्थानने तातडीच्या गरजेसाठी म्हणून 500 दशलक्ष डॉलर्सचे कर्ज देऊ केले. परराष्ट्र व्यवहारमंत्री एस. जयशंकर आणि अर्थमंत्री बासिल राजपक्षे यांच्यात 15 जानेवारी रोजी झालेल्या आभासी बैठकीनंतर हे कर्ज देण्यात आले. हिंदुस्थानची निर्यात-आयात बँक आणि श्रीलंका सरकार यांनी आज अर्थमंत्र्यांच्या उपस्थितीत पेट्रोलियम उत्पादनांच्या खरेदीसाठी 500 दशलक्ष डॉलर्स व्रेडिट लाइन करारावर स्वाक्षरी केली. श्रीलंकेचे बासिल राजपक्षे आणि श्रीलंकेतील हिंदुस्थानचे उच्चायुक्त गोपाल बागले यांनी प्रसिद्धिपत्रकात ही माहिती दिली.

गेल्या आठवडय़ात हिंदुस्थानने श्रीलंकेला त्याच्या साठय़ाला चालना देण्यासाठी 400 दशलक्ष डॉलर्स स्वॅप व्यवस्थादेखील मंजूर केली होती. मंगळवारी श्रीलंकेने इंडियन ऑइल कॉर्पोरेशनकडून प्रत्येकी 40 हजार मेट्रिक टन पेट्रोल आणि डिझेल खरेदी करण्याचा निर्णय घेतला होता. श्रीलंकेतील एकमेव रिफायनरी तेल आयातीसाठी पैसे देऊ न शकल्यामुळे नोव्हेंबर 2021मध्ये दोनदा बंद करावी लागली. गेल्या महिन्यात हिंदुस्थान सरकारने आपल्या शेजारील श्रीलंकेला एक अब्ज डॉलर्सचे साहाय्य पॅकेज जाहीर केले होते. श्रीलंकेला आजवर हिंदुस्थानने एकूण चार अब्ज डॉलर्स एवढी विकास मदत दिली आहे.