श्रीलंका हिंदुस्थानात आयोजित करणार रोड शो, पर्यटन वाढीसाठी श्रीलंकेच्या पर्यटन विभागाचे पाऊल

श्रीलंका हिंदुस्थान सोबतचे आपले परस्पर आणि सांस्कृतिक संबंध अधिक विस्तारत आहे. त्यासाठी हिंदुस्थानच्या प्रमुख शहरांमध्ये रोड शोंची एक मालिकाच आयोजित करण्यात आली आहे. 26 ते 30 सप्टेंबर 2022 दरम्यान हे रोड शो आयोजित करण्यात आले आहेत. पहिला रोड शो नवी दिल्ली येथे 26 सप्टेंबर रोजी ताज पॅलेस हॉटेल येथे आयोजित करण्यात आला असून पुढील शो 28 सप्टेंबर रोजी मुंबईत सेंट रेजीस येथे होणार आहे. तिसरा आणि अंतिम शो 30 सप्टेंबर 2022 रोजी हैदराबाद येथे ताज कृष्ण हॉटेल येथे होणार आहे.

या रोड शोंचा प्रमुख उद्देश हा श्रीलंकेचा हिंदुस्थानात एक सक्रीय पर्यटनस्थळ म्हणून प्रसार करणे हा आहे. हिंदुस्थान ही श्रीलंकेसाठी एक प्रमुख अशी बाजारपेठ असून या बाजारपेठेने श्रीलंकेला कोरोना आणि सध्याच्या आर्थिक मंदीच्या काळात काहीशा मंदीतून पुन्हा उभारी घेण्यासाठी मदतीचा हात दिला आहे. श्रीलंकेमध्ये पर्यटकांची संख्या वाढली असून त्यात हिंदुस्थानातून येणाऱ्या पर्यटकांची संख्या मोठी आहे. त्या माध्यमातून परदेशी पर्यटकांच्या बाबतीत हिंदुस्थान एक क्रमांकावर आहे. हिंदुस्थानातून आत्तापर्यंत 80,000 पर्यटक श्रीलंकेत आले असून 2023 पर्यंत हा आकडा दुपटीने वाढणे अपेक्षित आहे.

या सर्व आयोजनांना ग्लॅमरची झालर देण्यासाठी अनेक मान्यवरांचा त्यात समावेश केला जाणार आहे. त्यात क्रिकेटपटू सनथ जयसूर्या यांचाही समावेश असणार आहे. प्रत्येक आयोजनामध्ये नृत्य आणि मनोरंजनाचा समावेश असेल आणि त्या माध्यमातून प्रेक्षकांना श्रीलंकन संस्कृतीच्या दाखवून एक वेगळा अनुभव उपलब्ध करून दिला जाईल. नृत्यकलाकार त्यांच्या प्रतिभेची एक झलक यावेळी दाखवणार आहेत. या रोडशोदरम्यान पर्यटनमंत्री हे अनेक उच्चपदस्थ व्यवसाय अधिकारी, पर्यटन क्षेत्रातील भागधारक आणि कॉर्पोरेट कंपन्यांच्या अधिकाऱ्यांना भेटणे अपेक्षित आहे. त्याशिवाय हिंदुस्थानातील आघाडीच्या माध्यमांबरोबर मुलाखतींचेही आयोजन करण्यात आले आहे.