कोहलीच्या खास खेळाडूची क्रिकेटमधून अचानक निवृत्ती, नुकताच खेळला होता वन डे अन् टी-20 मालिका

हिंदुस्थान आणि श्रीलंका संघात नुकतीच तीन टी-20 सामन्यांची मालिका खेळली गेली. ही मालिका श्रीलंकेने 2-1 अशी आपल्या नावे केली. या मालिकेनंतर तात्काळ श्रीलंकेचा 33 वर्षीय वेगवान गोलंदाज इसुरु उडाना (Isuru Udana) याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली.

उडाना याची हिंदुस्थानविरुद्धच्या एक दिवसीय आणि टी-20 मालिकेसाठी निवड झाली होती. एक दिवसीय मालिकेतील पहिल्या आणि टी-20 मालिकेतील पहिल्या दोन लढतीत त्याने श्रीलंकेचे प्रतिनिधित्व केले होते. मात्र एक दिवसीय आणि टी-20 लढतीत त्याला एकही बळी मिळवता आला नाही. हिंदुस्थानचा हा दौरा संपताच शनिवारी उडाना याने क्रिकेटला रामराम करत असल्याचे जाहीर केले. उडानाच्या अचानक निवृत्तीमागचे कारण मात्र स्पष्ट झालेले नाही.

12 वर्षात फक्त 21 वन डे

दरम्यान, उडाना याचे श्रीलंकेच्या संघातील स्थान कधीच पक्के नव्हते. 12 वर्षाच्या कारकीर्दीमध्ये त्याने फक्त 21 एक दिवसीय आणि 35 टी-20 लढतीत श्रीलंकेचे प्रतिनिधित्व केले. यात त्याला फक्त 45 बळी मिळवता आले.

हिच ती वेळ

निवृत्तीची घोषणा केल्यानंतर उडाना याने एक ट्विट केले. यात त्याने क्रिकेटवर माझे नेहमीच प्रेम होते आणि पुढेही राहील असे म्हटले. तसेच देशाच्या सन्मानासाठी आणि खेळ भावना कायम राखण्यासाठी मी मैदानात आणि मैदानाबाहेर शंभर टक्के दिले, असेही म्हटले. तसेच निवृत्ती घेण्याची हिच योग्य वेळ असल्याचेही तो म्हणाला.

कोहलीचा खास खेळाडू

इंडिनय प्रीमिअर लीगमध्ये उडाना याने विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाचे प्रतिनिधित्व केले होते. आयपीएल 2020 साठी बंगलुरुने उडानाला आपल्या संघात घेतले होते. आरसीबीसाठी उडानाने 10 लढतीत 8 बळीही घेतले. मात्र आयपीएल 2021 पूर्वी बंगळुरुने त्याला रीलिज केले होते.

कारकीर्द

उडाना याने 2009 टी-20 वर्ल्डकप वेळी श्रीलंका संघाकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. 12 वर्षात त्याने 21 एक दिवसीय सामने खेळले. यात त्याने 52.78 च्या खराब सरासरीने फक्त 18 बळी मिळवले, तसचे 34 टी-20 लढतीत त्याला 33.89 च्या सरासरीने 27 बळी घेतला आहे. फलंदाजीत त्याने अनुक्रमे 237 आणि 256 धावा केल्या आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या