‘या’ धक्कादायक कारणासाठी श्रीलंकेत घडवले गेले स्फोट

98

सामना ऑनलाईन, कोलंबो

श्रीलंकेमध्ये रविवारी घडवण्यात आलेल्या भयंकर साखळी स्फोटांमध्ये आत्तापर्यंत 320 जणांचा मृत्यू झाला आहे. या दहशतवादी आत्मघातकी हल्ल्यामागे ‘नॅशनल तौहीद जमात’ या कुख्यात कट्टर मुस्लिम दहशतवाद्यांचा हात असल्याचे बोलले जात आहे. हा हल्ला का घडवण्यात आला याबाबत आत्तापर्यंत माहिती मिळत नव्हती. मात्र नव्याने उजेडात आलेल्या माहितीमुळे या कारणाचाही खुलासा झाला आहे.

न्यूझीलंडमध्ये काही दिवसांपूर्वी एका माथेफिरूने ख्राईस्टचर्च भागातील दोन मशिदींमध्ये अंदाधुंद गोळीबार केला होता. या गोळीबारामध्ये 50 जणांचा मृत्यू झाला होता. या हल्लाया बदला घेण्यासाठी श्रीलंकेत स्फोट घडवून आणण्यात आले अशी माहिती समोर आली आहे. श्रीलंकेचे उपसंरक्षणमंत्री रुवान विजेवार्देन यांनी तिथल्या संसदेला माहिती देण्यासाठी केलेल्या भाषणामध्ये स्फोटांमागील कारणाचा खुलासा झाला आहे. श्रीलंकेचे राष्ट्रपती मैत्रीपाल सिरीसेना यांनी या स्फोटांमागे ज्या दहशतवाद्यांचा हात आहे त्यांना शोधून काढण्यासाठी इतर देशांकडून सहकार्य मागितले आहे. स्फोटांचा कट रचण्यापासून ते घडवून आणण्यापर्यंत विदेशी दहशतवाद्यांनी मदत केली असावी असा दाट संशय आहे. हे दहशतवादी शोधून काढण्यासाठी इतर देशांकडून सहकार्य मागण्यात आले आहे.

‘नॅशनल तौहीद जमात’ या दहशतवादी संघटनेने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली असली तरी त्यांना बाहेरून मदत मिळाल्याशिवाय ते इतके मोठे हल्ले करूच शकत नाही असं श्रीलंकेच्या आरोग्यमंत्री रजिथा सेनारत्ने यांनी म्हटले आहे.

रविवारी स्फोटांनी कोलंबो हादरले असतानाच सोमवारी मध्य कोलंबोतील एका बस स्थानकावर आणखी 87 डिटोनेटर्स पोलिसांना आढळून आल्याने मोठी खळबळ माजली आहे. त्यामुळे या साखळी स्फोटांमागे मोठा कट रचण्यात आल्याची शंका व्यक्त होत आहे. यातील 12 बॉम्ब डिटोनेटर्स बस स्थानकाच्या मैदानात सापडले. त्यानंतर शोधमोहीम सुरू करताच आणखी 75 डिटोनेटर्स त्याच परिसरात आढळून आले, असे पोलिसांनी सांगितले. दरम्यान, एकीकडे कोलंबो स्फोटांमधील मृतांचा आकडा वाढत जात असतानाच कोलंबोमधील एका चर्चजवळ सोमवारीही एक मोठा स्फोट झाला. या चर्चजवळ उभ्या असलेल्या एका व्हॅनमध्ये जबरदस्त स्फोट झाला. या स्फोटाची छायाचित्रे प्रसिद्ध झाली असून व्हॅनमधून आगीचे लोळ उसळताना दिसत आहेत.

डेन्मार्कच्या अब्जाधीशाची तीन मुले ठार

रविवारी कोलंबोत झालेल्या साखळी बॉम्बस्फोटात डेन्मार्कचा अब्जाधीश अंद्रेस पॉलसन यांच्या तीन मुलांचा मृत्यू झाला. ते, पत्नी आणि चार मुलांसह श्रीलंकेत सुट्टी घालवण्यासाठी आले होते. रविवारी ईस्टर संडेनिमित्ताने पॉलसन कुटुंबासह चर्चमध्ये गेले असताना झालेल्या बॉम्बस्फोटात त्यांच्या तीन मुलांचा मृत्यू झाला.

तपासासाठी समितीची स्थापना

श्रीलंकेत दोन ठिकाणी स्फोटांसह तीन लक्झरी हॉटेलांमध्ये आणि तीन चर्चमध्ये रविवारी स्फोट झाले. या स्फोटांच्या तपासकार्यासाठी राष्ट्रपती मैत्रीपाला सिरिसेना यांनी तीन सदस्यीय समितीची स्थापना केली आहे. या समितीमध्ये तेथील सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती किजित माललगोडा यांचाही समावेश आहे. या तपासात स्फोटांशी संबंधित सर्वच बाजूंचा तपशील, त्यांची पार्श्वभूमी आणि इतर बाबींचाही आढावा घेण्याचा आदेश समितीला देण्यात आला आहे. समितीने येत्या दोन आठवडय़ांत आपला अहवाल सादर करायचा आहे.

आयफेल टॉवरचे दिवेही मालवले

श्रीलंकेतील कोलंबोत रविवारी झालेल्या साखळी बॉम्बस्फोटांत नाहक बळी पडलेल्या मृतांना आणि जखमींना आयफेल टॉवरनेही आपले दिवे मालवून श्रद्धांजली वाहिली. पॅरिसमधला हा टॉवर नेहमी प्रकाशमान असतो, पण कोलंबो स्फोटांतील मृतांच्या आदरांजलीसाठी मध्यरात्री 12 वाजता ते बंद ठेवण्यात आले. आयफेल टॉवरच्या अधिकृत ट्विटरवर त्यापूर्वीच ‘मध्यरात्री 12 वाजता टॉवरवरील दिवे विझवले जातील’ असा मेसेजही व्हायरल करण्यात आला होता.

बॉम्ब निकामी करताना गाडीत झाला नववा स्फोट

कोलंबोत आज चर्चजवळ गाडीत सापडलेला बॉम्ब निकामी करताना त्याचा स्फोट झाला. त्यामुळे गाडीचा चक्काचूर झाला आणि गाडीला आग लागली. मात्र, त्यात कोणालाही दुखापत झाली नाही. त्यामुळे परिसरात घबराट पसरली होती. हा नववा स्फोट आहे. त्या आधी आज सकाळी विमानतळाजवळूनही एक बॉम्ब ताब्यात घेण्यात आला.

आतापर्यंत 8 हिंदुस्थानी ठार

श्रीलंकेत झालेल्या बॉम्बस्फोटांमधील मृतांमध्ये 8 हिंदुस्थानींचा समावेश आहे. एच. शिवकुमार, वेमुराई तुलसीराम, एस. आर. नागराज, के. जी. हनुमंतरायप्पा, एम. रंगप्पा, लक्ष्मी, नारायण चंद्रशेखर, रमेश अशी मृतांची नावे आहेत. मृतांमध्ये कर्नाटक, तामीळनाडूचे रहिवासी आहेत.

सर्व आत्मघाती हल्लेखोर श्रीलंकन

श्रीलंकेच्या इतिहासातील सर्वात मोठय़ा ठरलेल्या या दहशतवादी आत्मघाती हल्ल्यामागे ‘नॅशनल तौहीद जमात’ नावाच्या स्थानिक दहशतवादी संघटनेचा हात असल्याचे श्रीलंकेचे आरोग्यमंत्री रजित सेनारत्ने यांनी सांगितले. ते पुढे म्हणाले की, हे हल्लेखोर श्रीलंकन असल्याचाच सरकारचा अंदाज आहे. विशेष म्हणजे सरकारी गुप्तचर यंत्रणेने या प्रकारच्या हल्ल्याची भीती 11 एप्रिल रोजीच व्यक्त केली होती. याबाबत त्यांनी श्रीलंकेच्या पोलीस महासंचालकांना सतर्क राहण्याचा इशाराही दिला होता.

आपली प्रतिक्रिया द्या