श्रीलंकेच्या खेळाडूला महिला अधिकाऱ्यासोबत रंगेहाथ पकडले, ‘एसएलसी’ कारवाईच्या तयारीत

इंग्लंड दौऱ्यावर  असणाऱ्या श्रीलंकेच्या एका तरुण खेळाडूला महिला अधिकाऱ्यासोबत हॉटेलच्या रुममध्ये रंगेहाथ पकडण्यात आले. यामुळे क्रीडा विश्वात खळबळ उडाली आहे. श्रीलंकन क्रिकेट बोर्डाने देखील याची तातडीने दखल घेत या प्रकरणी अहवाल मागवला आहे.

स्थानिक प्रसार माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, इंग्लंड दौऱ्यावर असणाऱ्या श्रीलंकन संघातील एका तरुण फिरकी गोलंदाजाला हॉटेलच्या रुममध्ये महिला अधिकाऱ्यासोबत नको त्या अवस्थेत रंगेहाथ पकडण्यात आले. पहिल्या कसोटीदरम्यान हा प्रकार घडल्याची माहिती मिळत आहे. या तरुण खेळाडूचे नाव समोर आले नसले तरी त्याच्यासोबत असणारी महिला मेडीकल स्टाफमधील असल्याचे समजते. प्रकरणाचे गांभीर्य पाहता श्रीलंकन क्रिकेट बोर्डाने अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहे.

या प्रकरणी श्रीलंकन क्रिकेट बोर्डाने माहिती देताना सांगितले की, प्रकरणाचे गांभीर्य ओळखून आम्ही टीम मॅनेजर असांथा डी मेल यांना या प्रकरणी अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. तुर्तास आम्हाला प्रसार माध्यमांमधून आलेल्या वृत्तामुळे ही बाब समजली असून याची सत्यता पडताळण्यासाठी अहवाल सादर करण्यास सांगण्यात आले आहे.

दरम्यान, श्रीलंका आणि इंग्लंड संघात दुसरा कसोटी सामना आज शुक्रवारपासून सुरू झाला आहे. हा सामना सुरू होण्यापूर्वी संघाचे प्रशिक्षक मिकी आर्थर यांना या प्रकरणी विचारण्यात आले असता ते म्हणाले की, अशा प्रकारची घटना होणे सध्या शक्य नाही, कारण सर्व खेळाडू बायो बबलमध्ये असून त्यांना बाहेर जाण्याची किंवा बाहेरच्या लोकांना त्यांच्या रुममध्ये येण्याची परवानगी नाही.

आपली प्रतिक्रिया द्या