श्रीलंकन क्रिकेटपटूंना 7 महिन्यांपासून पगार नाही, खेळाडूंची बोर्डाला चिठ्ठी लिहून पैसे देण्याची विनंती

श्रीलंकेच्या क्रिकेटपटूंना मागील सात महिन्यांपासून पगार मिळालेला नाही. यासंदर्भात सर्व खेळाडूंनी आपल्या क्रिकेट बोर्डाला चिठ्ठी लिहून कृपया आमचा पगार द्यावा, अशी विनंती केली आहे. सध्या श्रीलंकेचे सर्व खेळाडू दौरा ते दौरा अशा करारावर खेळत आहेत. यामुळे मालिकेसाठी संघात निवड झाली तरच खेळाडूंना पगार दिला जातोय.

श्रीलंका क्रिकेट बोर्ड आणि खेळाडू यांच्यात करारावरून सुरू असलेला वाद थांबण्याची चिन्हे दिसत नाहीत. या वादामुळेच श्रीलंकेचा दिग्गज अष्टपैलू खेळाडू अँजेलो मॅथ्यूजला निवृत्तीचा विचार करावा लागतोय. याचबरोबर दिमूथ करुणारत्ने, कुशल परेरा या वरिष्ठ खेळाडूंनीही करारावर स्वाक्षरी करण्यास नकार दिलेला आहे. खेळाडूंनी श्रीलंका क्रिकेट बोर्डाला चिठ्ठी लिहून, ‘‘या वर्षी जानेवारीपासून पगार दिला नाही. कृपया आमचा पगार द्यावा, आम्ही कोणत्याही करारावर स्वाक्षरी करण्यास तयार आहोत,’’ असे म्हटले आहे.

दौऱयाच्या करारामध्ये ज्यांची श्रीलंकेच्या संघात निवड होत नाही त्यांना पगार मिळत नाही. इंग्लंड आणि हिंदुस्थान दौऱयासाठी अशाच प्रकारे संघाची निवड झाली आहे. कर्णधार दासून शनाकासह संघात निवड झालेल्या खेळाडूंना पगार मिळणार आहे. नव्या करार पद्धतीमुळे श्रीलंका संघाच्या कामगिरीवर परिणाम झाला आहे. लंकेच्या संघाने बांगलादेशविरुद्धची वनडे, त्यानंतर इंग्लंडविरुद्धची वनडे आणि टी-20 मालिका गमावली होती. आता हिंदुस्थानच्या दुसऱया फळीतील संघाविरुद्धही श्रीलंकेला अपयशाचा सामना करावा लागत आहे.

आपली प्रतिक्रिया द्या