श्री माऊली मंदिराच्या कलशाचे जल्लोषात वाफोली गावात आगमन

सामना ऑनलाईन । बांदा

सावंतवाडीपासून सुमारे १२ किलोमीटर अंतरावर असलेल्या वाफोली गावातील श्री देवी माऊली मंदिराच्या पुनर्बांधणीचे काम सध्या अखेरच्या टप्प्यात आहे. येथील पंचायतन देवतांचा संप्रोक्षण विधी आणि मंदिर शिखर कलश प्रतिष्ठापना महोत्सव दिनांक २९ व ३० एप्रिल २०१८ रोजी साजरा होणार आहे. त्यानिमित्ताने श्री माऊलीच्या मंदिरामध्ये दोन दिवस विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. तत्पूर्वी रविवार, दिनांक २२ एप्रिल रोजी मंदिराच्या कलशाचे वाफोली गावात जल्लोषात आगमन झाले. भव्य मिरवणूक काढत पांपरिक-धार्मिक पद्धतीने गावकर्‍यांनी वाजतगाजत या कलशाचे स्वागत केले. यावेळी वाफोली गावाच्या सीमेपासून ते मंदिरापर्यंतचा संपूर्ण मार्ग तोरण-पताका लावून, सुंदर रांगोळी काढून सुशोभित करण्यात आला होता.

श्री देवी माऊली पंचायतन देवतांचा संप्रोक्षण विधी आणि मंदिर शिखर कलश प्रतिष्ठापना महोत्सवांतर्गत रविवार, दिनांक २९ एप्रिल रोजी सकाळी साडेसात वाजेपासून कलश प्रतिष्ठापनेचे पूर्वविधी सुरू होतील. सोमवार, दिनांक ३० एप्रिल रोजी सकाळी ९ वाजून ३९ मिनिटांनी शिखर कलश स्थापना करण्यात येईल. यादिवशी महाआरती आणि महानैवेद्याचेही आयोजन करण्यात येणार आहे. तसेच संध्याकाळी स्थानिकांची भजने आणि रात्री दशावतार नाट्यप्रयोग होणार आहे.

आपली प्रतिक्रिया द्या