हरित लवादाने श्री श्री रविशंकर यांना फटकारले

39

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

‘आर्ट ऑफ लिव्हींग’चे धडे देणारे अध्यात्मिक गुरू श्री श्री रविशंकर यांना राष्ट्रीय हरित लवादाने (एनजीटी) फटकारले. ‘आर्ट ऑफ लिव्हींग’चे वर्तन अतिशय बेजबाबदार आहे आणि ते वाटेल ते बोलू शकत नाही, असे हरित लवादाने सुनावले.

‘जागतिक सांस्कृतिक महोत्सवामुळे पर्यावरणाचे जे काही नुकसान झाले असेल त्याला सरकार आणि हरित लवादच जबाबदार आहे. ‘आर्ट ऑफ लिव्हींग’बाबत न्याय करताना नैसर्गिक न्यायाला डावलून ऐतिहासिक कार्यक्रमाला गुन्ह्याचे स्वरुप दिले जात आहे’, असा आरोप श्री श्री रविशंकर यांनी मंगळवारी आपल्या फेसबुक पोस्टमधून केला होता. या पोस्टची दखल हरित लवादाने घेतली आहे.

लवादाने नेमलेल्या तज्ज्ञांच्या समितीवर ‘आर्ट ऑफ लिव्हींग’ आणि श्री श्री रविशंकर यांनी केलेले आरोप निराधार आहेत. रविशंकर यांनी पूर्वग्रहातून हे आरोप केले आहेत. ‘आर्ट ऑफ लिव्हींग’ला आपल्या जबाबदारीचे किंचितही भान नाही. तुम्हाला काय वाटतं, तुम्हाला बेछूट बोलण्याची सूट दिली आहे का? असे म्हणत हरित लवादाने ‘आर्ट ऑफ लिव्हींग’ला फटकारले.

‘आर्ट ऑफ लिव्हींग’ने दिल्लीत यमुनेच्या काठावर गेल्या वर्षी (२०१६) ११ ते १३ मार्च दरम्यान जागतिक सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन केले होते. या प्रकरणावर गुरुवारी हरित लवादाने सुनावणी घेतली. आता पुढील सुनावणी पुढच्या महिन्यात ९ मे रोजी होणार आहे. लवादाने रविशंकर यांनी फेसबुकवर मांडलेले मत रेकॉर्डवर घेणार असल्याचे संकेत दिले आहेत.

श्री श्री रविशंकर यांच्या आर्ट ऑफ लिव्हींगने यमुनेच्या काठावर आयोजित केलेल्या कार्यक्रमामुळे पूररेषेतील भागाचे मोठे नुकसान झाले आहे. हे नुकसान भरून काढण्यासाठी १३.२९ कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. नदी काठावरील हानी भरून काढण्यासाठी किमान १० वर्ष लागतील. नदीच्या उजव्या काठावरील ३०० एकर आणि डाव्या काठावरील ५० एकर जमिनीचे मोठे नुकसान झाले आहे. कार्यक्रमामुळे जमिनीची उत्पादकता नष्ट झाली आहे. गवत किंवा झाडंही तिथे आता जगू शकत नाही, असं हरित लवादाने नेमलेल्या तज्ज्ञ समितीने आपल्या अहवालात नमूद केले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या