#SriLanka- बॉम्बस्फोटांमागे मुस्लीम दहशतवादी संघटनेचा हात? हिंदुस्थानी दूतावास निशाण्यावर

30

सामना ऑनलाईन । कोलंबो

श्रीलंकेत एका मागोमाग एक झालेल्या आठ बॉम्बस्फोटांमागे मुस्लीम दहशतवादी संघटनेचा हात असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. श्रीलंकेच्या इतिहासातील हा सर्वात भयंकर हल्ला असून या हल्ल्यात आतापर्यंत 187 जण ठार, तर 300 हून अधिक नागरिक जखमी झाले आहेत. दरम्यान, कोलंबोतील हिंदुस्थानी दूतावासही दहशतवाद्यांच्या निशाण्यावर असल्याचे वृत्त आहे.

गल्फ न्यूजने दिलेल्या वृत्तानुसार, बॉम्बस्फोट घडण्याच्या दहा दिवसांपूर्वी श्रीलंकेच्या गुप्तचर यंत्रणेने मोठा दहशतवादी हल्ला होण्याचा गोपनीय अहवाल पोलीस प्रमुखांना दिला होता. तसेच आत्मघाती हल्लेखोर देशात चारही बाजूंनी हल्ला करू शकतात, असे संकेतही पोलिसांना या अहवालातून देण्यात आले होते. त्यानंतर पोलीस प्रमुख पुजुथ जयसुंदर यांनी 11 एप्रिल रोजी वरिष्ठ अधिकाऱ्यांना याबद्दल सूचित केले होते. या अहवालाबरोबर परदेशी गुप्तचर यंत्रणेने दिलेल्या महत्त्वपूर्ण सूचनांबद्दलही अहवालात सांगण्यात आले होते. त्यात नॅशनल तोहीत जमात (एनटीजे) ही दहशतवादी संघटना देशातील काही चर्चमध्ये बॉम्बस्फोट घडवण्याचे कारस्थान करत असल्याचा इशारा देण्यात आला होता. तसेच या संघटनेच्या निशाण्यावर कोलंबोतील हिंदुस्थानी दूतावासही असल्याचे नमूद करण्यात आले होते. नॅशनल तोहीत जमात ही कट्टर मुस्लीम संघटना असून गेल्या वर्षी येथील बौद्ध धर्मस्थळांवर हल्ला झाल्यानंतर ही संघटना प्रकाशझोतात आली होती.

आपली प्रतिक्रिया द्या