भगवद्गीता: काल, आज आणि उद्या

>>प्रणव गोखले (सहाय्यक संचालक, वैदिक संशोधन मंडळ, पुणे)

आजकालच्या ‘Up to Date’ राहण्याच्या स्पर्धेमध्ये उतरलेला प्रत्येकजण ‘जुने जाऊ द्या मरणालागुनी, जाळुनी किंवा पुरुनी टाका’चा उद्घोष करीत जुन्या धारणा, परंपरा, संस्कृती यांची संभावना ‘Dustbin’ म्हणुन करत आहे. अशा परिस्थितीत सोशल नेटवर्किंग साईटस् वर सणावारी आपल्या ‘Culture’ च्या गुढया सातासमुद्रापार कशा पोहोचल्या आहेत हे सांगुन ‘Share’ आणि ‘Likes’ कमावण्यापुरती का होईना; वेदोपनिषदे, पुराणे, रामायण, महाभारत ह्यांची माहिती आणि महती आजच्या पिढीला ठावी आहे, खरतरं हेही नसे थोडके. या ‘सांस्कृतिक संक्रांती’च्या काळांतही शाळा-कॉलेजमध्ये यशस्वी जीवनाची मूलसूत्रे, Ways to success अशा पाठ्यक्रमांऐवजी किमान पाठांतरासाठी का होईना भगवद्गीता वाचली-पाहिली-हाताळली जात आहे हे सुदैवच म्हणावे लागेल. आज ‘Mangement ideas in the Geeta’, ‘Management Guru- Krishna’ अशा आशयाची पुस्तके, लेख प्रसिद्ध होत आहेत. विज्ञान-तंत्रज्ञानातील प्रगतीमुळे जेथे कालपर्यंत नवा असणारे शोध आज Outdated ठरत आहेत, तेथे कित्येक शतकांपूर्वीचा हा ग्रंथ संशोधक-चिकित्सकांना आजही खुणावत राहिला आहे.

कितीही डोक्यावरून गेली तरी साक्षात देवाने सांगितलेली गीता डोळ्याखालुन किंवा कानावरुन गेली तर पुण्य लागेल या श्रद्धेने पारायणे करणाऱ्या भोळ्या भाविकांपासून, ‘दिवि सूर्यसहस्रस्य भवेद्युगपदुत्थिता |’( गीता ११/१२) यांसारख्या उल्लेखांमधुन ‘अणुस्फोटा’च्या प्रत्ययाचा धांडोळा घेणाऱ्या संशोधकांपर्यंत प्रत्येकालाच गीता आपलीशी वाटते. थोड्या वेगळ्या शब्दात सांगावयाचे झाल्यास सिद्ध आणि बद्ध दोघांनाही गीता सारखीच हवीहवीशी वाटते.

अध्यात्मशास्त्रामध्ये प्रचलित असणाऱ्या वेगवेगळ्या साधनामार्गांचा समन्वय साधणारे ‘भगवद्गीता’ हे उपलब्ध वाङ्मयामधील पहिले ‘Digest’ ठरते. महाभारतकारांनी मांडलेला ‘गीते’चा Format (प्रारूप) इतका लोकप्रिय ठरला की शैव, शाक्त, गाणपत्य अशा अन्य संप्रदायांमधील विद्वानांनी आपापल्या इष्टदेवतेच्या गीता (उदा.- ईश्वरगीता,देवीगीता, गणेशगीता इ.) या Format बरहुकूम तयार केल्या. आणि इतके होऊनही पुन्हा मूळ भगवद्गीतेची लोकप्रियता अबाधितच राहिली. अभिनवगुप्त, रामकंठ यांसारख्या शैव आचार्यांनी सिद्धांतमांडणीसाठी ईश्वरगीतेपेक्षा भगवद्गीतेलाच अधिक प्रमाण मानले. आजच्या भाषेत सांगावयाचे झाल्यास गीतेला त्याकाळातील अध्यात्म- Trend-maker च म्हणावे लागेल. गीतेच्या आधारे आद्य शंकराचार्य ‘अद्वैत’ सिद्ध करतात तर ‘द्वैत’ सिद्धांत मांडण्यासाठी मध्वाचार्य गीतेलाच प्रमाण मानतात. ज्ञानोबा माउली या गीतार्थाचेनी मिषे गुरुकृपे लाधलेले ‘समाधिधन’ प्राकृत जनांना मुक्तहस्ते लुटवतात तर अरविंदांसारखे योगी गीतानुसंधानातून ‘ब्रह्मभवनाचा’ साक्षात्कार घडवतात. निष्काम-कर्मयोग सांगण्यासाठी लोकमान्य टिळक गीतेचाच आश्रय घेतात तर गीतेच्याच आधारे महात्मा गांधी आणि विनोबा अनासक्तीचे धडे सत्याग्रहींना देतात. महिम्नकार पुष्पादंताच्या शब्दांत सांगावयाचे झाल्यास ‘रुचीनां वैचित्र्यादृजुकुटीलनानापथजुषां’ अशा भिन्न भिन्न मतांच्या नररत्नांना एकत्र गुंफणारं गीता हे मूलसूत्र म्हणावे लागेल. लॉरिंझर, वेबर, लासेन, गार्ब, फार्कुहर यांसारख्या पाश्चात्य विचारवंतांनी गीतेच्या तत्त्वज्ञानाच्या आधारे प्राच्य आणि पाश्चात्य विचारधारांमधील साम्यसूत्रांचा मागोवा घेतला.

ज्ञानयोग असो किंवा कर्मयोग, भक्तियोग असो वा ध्यानयोग प्रत्येक योगाचे सारसर्वस्व गीतेमध्ये समाहित आहे. मात्र गीता यांपैकी केवळ एकच मार्ग प्राधान्याने सांगते असे म्हणणे तर्कसंगत होणार नाही. गीतेचा मोठेपणा यांतच आहे की गीता ही असामान्य साधकापासून सामान्यातल्या सामान्य साधकाला सहज साध्य होऊ शकतील त्या साधना पद्धती सांगते. आदर्शवादापेक्षा गीता वास्तववादी आहे म्हणूनच ती प्रत्येकाला, प्रत्येक काळांत मार्गदर्शन करण्यास समर्थ आहे. गीतेचे हेच नित्यनूतन स्वरूप विशद करताना ज्ञानोबा माउली म्हणतात- या गीतार्थाची थोरी | स्वये शंभू विवरी | जेथ भवानी प्रश्नु करी | चमत्कारोनी || तेथ हरु म्हणे नेणिजे | देवी जैसे कां स्वरूप तुझे | तैसे नित्यनूतन देखिजे | गीतातत्त्व || (ज्ञानेश्वरी १/७०-७१) ओव्यांचा अर्थ अगदी स्पष्ट आहे. भगवान शिव जगन्माता पार्वतीला सांगत आहेत की, हे उमे ! तुझ्या रूपाप्रमाणे भगवद्गीतेचे रूप देखील अनुपम्य आणि नित्यनूतन आहे. गीतेचे हे कल्पान्तस्थायी स्वरूप लोकांना आयुष्याच्या कुरुक्षेत्रावर असेच मार्गदर्शन करीत राहील यात संशय नाही.

आपली प्रतिक्रिया द्या