मुंबईचा दहावी निकाल घसरला; सहा विद्यार्थ्यांना 100 टक्के गुण, 8 शाळांचा शून्य टक्के निकाल

मुंबई विभागाच्या निकालात घसरण सुरूच असून यंदाच्या परीक्षेत 3 लाख 35 हजार 120 विद्यार्थ्यांपैकी 3 लाख 13 हजार 876 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. निकालाची टक्केवारी 93.66 एवढी आहे. मुलींच्या उत्तीर्णतेचे प्रमाण मुलांपेक्षा जास्त असून 95.49 टक्के मुली, तर 91.95 टक्के मुले उत्तीर्ण झाली आहेत. 

मुंबईतील 11 हजार 785 विद्यार्थ्यांना 90 टक्क्यांपेक्षा जास्त गुण मिळाले असून यात 6 विद्यार्थ्यांना 100 टक्के गुण आहेत, तर 20 हजार 270 विद्यार्थी 90 ते 85 टक्क्यांदरम्यान आणि 27 हजार 789 विद्यार्थी 80 ते 85 टक्क्यांदरम्यान आहेत. मुंबई विभागातील 8 शाळांचा निकाल शून्य टक्के इतका लागला आहे.

92 हजार 505 विद्यार्थ्यांना डिस्टिंक्शन

मुंबई विभागातील 92 हजार 505 विद्यार्थी डिस्टिंक्शनमध्ये उत्तीर्ण झाले आहेत, तर 1 लाख 12 हजार 1 विद्यार्थ्यांना प्रथम श्रेणी मिळाली आहे. 83 हजार 70 विद्यार्थी द्वितीय श्रेणीत, तर 26 हजार 300 विद्यार्थ्यांना उत्तीर्ण श्रेणी मिळाली आहे.

रायगड आघाडीवर, मुंबई उपनगरचा कमी निकाल

मुंबई विभागात रायगड जिह्याचा सर्वाधिक निकाल लागला लागला आहे, तर सर्वात कमी निकाल मुंबई उपनगरचा लागला आहे. रायगड जिह्याच्या निकालाची टक्केवारी 96.68 इतकी असून मुंबई उपनगरचा निकाल 94.82 टक्के इतका लागला आहे.

ऑनलाइन समुपदेशनाची सुविधा

राज्य शिक्षण मंडळाने निकालानंतर नकारात्मक विचाराने ग्रासलेल्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी 25 जूनपर्यंत ऑनलाइन समुपदेशनाची सुविधा उपलब्ध करून दिली आहे.  सकाळी 8 ते रात्री 8 या वेळेत विद्यार्थ्यांना विविध समस्यांवर मार्गदर्शन करतील. समुपदेशकांचे संपर्क क्रमांक-

7387400970, 8308755241, 9834951752, 8421150528, 9404682716, 9373546299, 9321315928, 7387647902, 8767753069.

1 लाख 73 हजार 586 विद्यार्थ्यांना सवलतीचे गुण

राज्यातील एकूण 1 लाख 73 हजार 586 विद्यार्थ्यांना सवलतीचे गुण मिळाले आहेत. सवलतीच्या गुणांचा लाभ घेणारे सर्वाधिक विद्यार्थी कोल्हापूर जिह्यातील आहेत. जिह्यातील 42 हजार 649 विद्यार्थ्यांना सवलतीचे गुण मिळाले आहेत, तर मुंबईतील 29 हजार 366 विद्यार्थ्यांना सवलतीचे गुण आहेत.

जिल्हानिहाय निकाल

जिल्हा             एकूण विद्यार्थी   उत्तीर्ण    टक्केवारी

  • ठाणे             1,11,182    104102   93.63
  • रायगड           34,474   32,847     95.28
  • पालघर          57,720   53,999     93.55
  • मुंबई              28,836     27,094  93.95
  • उपनगर 1       58000    54,263    93.55
  • उपनगर 2       44,908   41,571   92.56

टक्केवारीनुसार विद्यार्थी संख्या (मुंबई)

  • 90 टक्के त्यापेक्षा जास्त      –      11,785
  • 85 ते 90          –    20,270
  • 80 ते 85          –    27,789
  • 75 ते 80          –    33,077
  • 70 ते 75          –    35,946
  • 65 ते 70          –    36,903
  • 60 ते 65          –    41,019
  • 45 ते 60          –    87,213
  • 45 पेक्षा कमी         –      30,079

गुण पडताळणीसाठी 3 ते 12 जून

निकालानंतर गुण पडताळणीसाठी 3 ते 12 जून, छायाप्रतीसाठी 3 ते 22 जून या कालावधीत अर्ज करता येईल. गुणांच्या पुनर्मूल्यांकनासाठी आधी उत्तरपत्रिकेची छायाप्रत घेणे बंधनकारक आहे. पुनर्मूल्यांकनासाठी विद्यार्थ्यांनी स्वतः किंवा शाळेमार्फत विभागीय मंडळाकडे ऑनलाइन अर्ज करणे आवश्यक असल्याचे स्पष्ट करण्यात आले.

गुणपत्रिकेसोबत स्थलांतर प्रमाणपत्रही मिळणार

यंदा विद्यार्थ्यांना बारावीच्या गुणपत्रिकेसोबतच स्थलांतर प्रमाणपत्रही मिळणार आहे. शाळांमधून 5 जून दुपारी 3 वाजता त्याचे वाटप होईल, तर दहावीच्या विद्यार्थ्यांना 14 जूनला 3 वाजता वाटप करण्यात येईल, असे राज्य शिक्षण मंडळाच्या सचिव अनुराधा ओक यांनी स्पष्ट केले.

पुरवणी परीक्षेसाठी 7 जूनपासून नोंदणी 

पुनर्परीक्षार्थी आणि श्रेणी सुधारू इच्छिणाऱया विद्यार्थ्यांसाठी जुलै-ऑगस्टमध्ये पुरवणी परीक्षा घेण्यात येणार आहे. त्यासाठीची ऑनलाइन अर्ज प्रक्रिया 7 जूनपासून सुरू होणार असल्याची माहिती राज्य मंडळाकडून देण्यात आली आहे.

100 टक्के गुण मिळणारे विद्यार्थी

  • लातूर      – 108
  • संभाजीनगर     –      22
  • अमरावती   –    7
  • मुंबई       – 6
  • पुणे         – 5
  • कोकण     –  3   नाशिक, नागपूर,
  • कोल्हापूर – 0