पेपर लिहायला जाण्यापूर्वी पित्याचे निधन, पार्थिव घरी ठेवत मुलीने दिली दहावीची परीक्षा

17
exam
प्रातिनिधिक फोटो

सामना ऑनलाईन, नांदेड

नांदेड जिल्ह्यातील थारा गावामध्ये दहावी इयत्तेत शिकणाऱ्या एका मुलीने वयस्कर माणसंही हतबल होतील अशा परिस्थितीला असामान्यपणे धीर एकवटत तोंड दिले. माया असं या विद्यार्थिनीचे नाव असून तिचे दहावीचे पेपर सुरू आहेत. ९ मार्चला पहाटे पाच वाजता मायाच्या वडीलांचे निधन झाले. त्याच दिवशी सकाळी अकरा वाजता तिचा पेपर होता. गावकऱ्यांनी एकत्र येत तिला धीर देण्याचं काम केलं. यामुळे या दहावीत शिकणाऱ्या मुलीने वडीलांचे पार्थिव घरीच ठेवत परीक्षेला जाण्याचा निर्णय घेतला.

पेपर संपवून आल्यानंतर मात्र या मुलीचा संयम सुटला आणि साश्रूनयनांनी तिने वडीलांवर अत्यंसंस्कार केले. मायाने अवघ्या ७ महिन्यापूर्वी तिची आई गमावली होती. त्या धक्क्यातून सावरत तिने दहावीच्या परीक्षेसाठी अभ्यास केला होता. मात्र परीक्षेच्यावेळी तिचे वडीलही गेले आणि माया पोरकी झाली. दुसरी कोणी व्यक्ती असती तर ती या परिस्थितीमुळे साफ कोलमडून पडली असती. मायाचे आईवडील तिला लहान वयात सोडून गेल्यानं ग्रामस्थ हळहळ व्यक्त केलत आहेत मात्र या परिस्थितीला मायाने ज्या धीरानं तोंड दिलं त्याबद्दल तिचं सर्वत्र कौतुक केलं जात आहे.

आपली प्रतिक्रिया द्या