राज्यात महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत चालला आहे. प्रवासात, शाळेत, घरात, आणि कामाच्या ठिकाणी सुद्धा महिला सुरक्षित नाहीत. गेल्या काही दिवसांपासून दररोज महिलांवरील अत्याचाराच्या घटना समोर येत आहेत. अशातच आता शाळकरी मुलीचा एसटी बसमध्ये वाहकाने विनयभंग केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. तसेच विद्यार्थीनींनी वाहकाला चोपून काढले असून याप्रकरणी वाहकाविरोधात दाभोळ पोलीस ठाण्यात पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आज बुधवारी (09 ऑक्टोबर 2024) सकाळी 8 च्या दरम्यान एक अल्पवयीन मुलगी दाभोळकडे जाणाऱ्या एसटी बसमधून प्रवास करत होती. आघारी फाटा येथे तिला उतरायचे होते. मात्र बसचा वाहक माजीद मेहबूब तांबोळी (वय 40) यांनी तिला उतरण्यास मज्जाव केला. तसेच तिला फिरुन येऊ असे सांगितले आणि तिला चुकीच्या पद्धतीने स्पर्श केला. याच वाहकाने असे गैरवर्तन यापूर्वीही केले होते. सदर प्रकाराची माहिती मुलीने कुटुंबीयांना दिली. त्यानंतर ग्रामस्थांनी पोलीस ठाण्यात धाव घेत मुलीला न्याय मिळावा अशी मागणी केली. मुलीच्या तक्रारीवरुन वाहक माजीद मेहबूब तांबोळी याच्या विरोधात पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल झाला असून त्याला अटक करण्यात आले आहे. अधिक तपास दाभोळ सागरी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरिक्षक अमोल गोरे करत आहेत.