
सर्वसामान्यांची जीवन वाहिनी असलेल्या एसटीचा कारभार पुरता खिळखिळा झाला असून त्याचाच प्रत्यय सांगिली जिह्यात आला आहे. कवठेमहांकाळ-घाटनांद्रे या मार्गावर धावणाऱयाबसचा ऑक्सिलेटर शुक्रवारी अचानक तुटला. प्रवाशांनी खचाखच भरलेली बस आता पुढे न्यायची कशी असा प्रश्न चालकासमोर निर्माण झाला होता. तेव्हा त्याने एक गावठी जुगाड करत तुटलेल्या ऑक्सिलेटरला दोरी बांधून ती चक्क महिला वाहकाच्या (कंडक्टर) हाती दिली. या आगळ्या वेगळा जुगाड करत चालकाने तब्बल 40 किलोमीटर दूरपर्यंत सुरक्षितपणे बस पोहचवण्याची कसरत केली. त्याचा हा व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल होत आहे.
सांगली जिह्यातील कवठेमहांकाळ आगाराची बस कवठेमहांकाळ-घाटनांद्रे या मार्गावर धावत असताना ऑक्सिलेटर तुटल्याचा प्रकार घडला. त्यामुळे नादुरुस्त एसटी बसेचचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. ऑक्सिलेटर खराब झालेल्या बसमुळे प्रवाशांचे हाल होऊ नयेत म्हणून नाइलाजास्तव वाहकाने हा जुगाड केल्याचे समोर आले आहे. नादुरुस्त ऑक्सिलेटर दोरीने बांधून चालकाने शेवटी ती दोरी महिला कंडक्टरच्या हाती दिली. महिला कंडक्टरला चालकाने ती दोरी योग्यवेळी कमी-जास्त ओढण्यास सांगितली, अशा पद्धतीने त्यांनी जवळपास 40 किलोमीटर अंतर पार केले. हा जुगाड यशस्वी झाला असला तरी दुर्दैवाने अपघात घडला असता तर त्याला जबाबदार कोण? असा प्रश्न आता विचारला जात आहे.