
बसस्थानकांच्या आवारातील अवैध खासगी वाहतूक रोखण्यासाठी एसटी महामंडळाच्या मुंबई विभागाने कठोर पावले उचलली आहेत. याच मोहिमेंतर्गत दादर येथील शिवनेरी बसस्थानकाच्या परिसरात ७३ खासगी गाड्यांच्या अवैध वाहतुकीवर कारवाई करण्यात आली. परळ आगार, सुरक्षा आणि दक्षता विभाग तसेच पोलिसांनी संयुक्त कारवाई करीत अवैध खासगी गाड्यांना दंडाचा दणका दिला.
एसटी बसस्थानकांच्या आवारात खासगी गाड्यांचे प्रमाण वाढल्याने महामंडळाच्या महसुलावर त्याचा विपरीत परिणाम झाला आणि महामंडळाच्या तोट्यात भर पडली. हा फटका बसल्यानंतर एसटी बसस्थानकांच्या २०० मीटर परिसरातील अवैध खासगी वाहतुकीवर कारवाई तीव्र केली आहे. या अंतर्गत दादर पूर्वेकडील एसटीच्या शिवनेरी बसस्थानक परिसरात विशेष वॉच ठेवून कारवाई करण्यात येत आहे. परळ आगार व्यवस्थापक नितीन चव्हाण, सुरक्षा व दक्षता अधिकारी गिरीश यादव, शीव वाहतूक पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संदीप मोरे यांच्या पथकाने धडक मोहीम हाती घेत एकाचवेळी ७३ अवैध खासगी गाड्यांना कारवाईचा दणका दिला. एसटीचे प्रवासी स्वतःकडे खेचून महामंडळाला तोट्यात घालणाऱ्या खासगी गाड्यांकडून प्रत्येकी १५०० रुपयांचा दंड आकारल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

























































